पुणे : अंत्यविधी पाससाठी नातेवाईकांना यातना ; वैकुंठ स्मशानभूमी आणि विश्रामबाग वाडा येथील पास सुविधा बंद

पुणे : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,’ असा अनुभव शायरीतून व्यक्त होत असला, तरी महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे मृतांच्या नातेवाईकांना त्या उलट अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. अंत्यविधीचा पास देण्याची आतापर्यंत सुविधा असलेली विश्रामबाग वाडा आणि वैकुंठ स्मशानभूमीतील पास सुविधा महापालिकेने बंद केली आहे. त्यामुळे अंत्यविधी पास मिळविण्यासाठी जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे शोकाकुल असलेल्या नातेवाईकांना अंत्यविधीचा पास नक्की कुठे मिळेल, याची शोधाशोध करावी लागत आहे.

मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीचा पास काढावा लागतो. महापालिकेच्या विश्रामबाग वाडा येथून आणि वैकुंठ स्मशानभूमीसह अन्य स्मशानभूमीत तसा पास मृतांच्या नातेवाईकांना दिला जात होता. मात्र ही सुविधा तीन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली. मनुष्यबळाचे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले. विश्रामबाग वाडा आणि वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधीचे पास मिळतात, आणि ही सेवा चोवीस तास असल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांकडून या दोन ठिकाणी धाव घेतली जात होती. मात्र अचानक ही सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीचा पास कसा मिळवायचा, असा प्रश्न मृतांच्या नातेवाईकांना भेडसावत आहे.

त्याबाबत तक्रारही महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र महापालिकेकडून त्याला केराची टोपली दाखविण्यात आली असल्याने मृतांच्या नातेवाईकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.महापालिकेकडून दिला जाणारा मृत्यू पासही मिळण्यास विलंब लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. मृत्यू पास वेळेवर मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या बँका, भविष्य निर्वाह निधी, विमा संरक्षणसह अन्य आवश्यक आर्थिक कामे रखडली जात आहेत.

मृत्यू पासची सुविधा ऑनलाइन असली, तरी तो मिळविण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना क्षेत्रीय कार्यालय आणि जन्म-मृत्यू विभागाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यातच आता अंत्यविधीचा पासही मिळणे अडचणीचे झाल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
वैकंठ स्मशानभूमीतील पास सुविधा बंद करण्यात आली आहे. महापालिकेचे ५७ दवाखाने, प्रसूतिगृहातून दिवसा पास दिला जातो. तर ससून आणि कमला नेहरू रुग्णालयातून चोवीस तास पास दिला जातो. – डॅा. कल्पना बळिवंत, आरोग्य अधिकारी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply