पुढील 'राज'नीती कोणती? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची भेट, दीड तास खलबतं

Maharashtra Politics : आज राजकीय वर्तुळात चर्चा होती ती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीची. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तब्बल तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थवर ही भेट घेतल्यचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या दोघांच्या भेटीत आगामी पालिका निवडणुकीबाबत खलबतं झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहून कौतुक केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या उद्देशाने ही भेट नियोजित आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पार पडली. या काळात त्यांची भेट घेणं शक्य न झाल्यामुळे फडणवीस त्यांच्या भेटीसाठी गेल्याचं म्हटलं जातं आहे. 

शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजप सत्तेत आली मात्र मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पत्र लिहून फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेतील बंडानंतर झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी राज ठाकरेंच्या भूमिकेचं भाजपकडून स्वागत करण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आजची भेट ही सदिच्छा भेट होती की, राजकीय रणनीती आखणारी होती, हे येणारा काळच सांगेल. 

शिवसेना भाजपपासून दुरावल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मैत्री

राज ठाकरे यांनी शिवतीर्थ हे नवीन घर बांधलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी तिथे जाऊन पाहुणचार स्वीकारला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होत आहे. शिवसेना भाजपपासून दुरावल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री वाढलेली दिसते. आता शिवसेनेचा एक गट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीत काय चर्चा होते, याची उत्सुकता आहे. 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply