नाशिकमध्ये दुसरी बस दुर्घटना : धावत्या बसने घेतला पेट; चालक-वाहकासह प्रवाशांनी मारल्या उड्या

नाशिक-औरंगाबाद मार्गावर आज पहाटे खासगी बसला आग लागून त्यामध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमध्ये राज्य परिवहन मंडळाची एक धावती बस पेटल्याची घटना घडली आहे.ही बस पिंपळगाव बसवंतहून सप्तशृंगी गडावर चालली होती.

नाशिकमधील कळवण तालुक्यातील श्री सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतीच्या टोलनाक्याच्या जवळ आज (शनिवार) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग लागल्याची घटना घडली. ही एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. आग लागल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी तत्काळ बसमधून खाली उड्या मारल्याने मोठी जीवितहानी टळली.

यात्रा नियंत्रण समितीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप वे कर्मचारी आदी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करून अग्निशमन साहित्याद्वारे तत्काळ आग विझविली.

सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्वजण सुरक्षित आहेत. भाविकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा महसूल, पोलीस व ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपालिका तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply