नांदेड फाटा खुन प्रकरणातील टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

किरकटवाडी - सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड फाटा (Nanded Phata) परिसरात भरदिवसा एका सराईत गुन्हेगाराची (Criminal) कोयत्याने वार करुन हत्या (Murder) करणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर (Criminal Gang) मोक्कांतर्गत (Mokka) कारवाई करण्यात येणार आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसलेल्या परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी तेगबीरसिंह संधु यांनी धडक कारवाई करत गुन्हेगारांना पहिला दणका दिला आहे. महत्वाचे म्हणजे कोल्हापूर परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सदर मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईला मंजुरी दिली आहे.

दशरथ उर्फ राज दत्तात्रय जाधव (वय 24 रा. गोसावी वस्ती, नांदेड ता. हवेली), कृष्णकांत उर्फ दादा चंद्रकांत चव्हाण (वय 24 रा. गोपाळवस्ती नांदेड गाव), अभिषेक राम गंगणे (वय 20 रा. गल्ली नं 42, जनता वसाहत), अमोल अर्जुन शेलार (वय 19, रा. पोकळे वस्ती, धायरी), आदित्य गणेश आदावडे (वय 20, रा. गणेश मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत) अशी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. दि. 23 मार्च 2022 रोजी सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याकडून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सराईत गुन्हेगार मारुती ढेबे याची या आरोपींनी हत्या केली होती. भरदिवसा व वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोपींना अटक केल्यापासूनच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या हालचाली हवेली पोलीसांनी सुरू केल्या होत्या. त्यानुसार हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस तेगबीरसिंह संधु यांनी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे.

'यापुढेही अशा दहशत माजविणाऱ्या व संघटित गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का आणि एमपीडीए कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाणार आहे.'



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply