नवी दिल्ली : सीमावादाबद्दल इतरांनी शिकवू नये!; दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

नवी दिल्ली : ‘राज्य सरकार पूर्णपणे सीमाभागांतील मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून तसा ठराव विधानसभेत मंगळवारी मांडला जाईल. सीमाप्रश्नी मी तुरुंगवास भोगला असून या वादाबद्दल इतरांनी आम्हाला शिकवू नये’, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंना दिले.

केंद्र सरकारने आयोजित केलेल्या वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते थेट नागपूरला जाणार होते. मुख्यमंत्री दिल्लीत असल्यामुळे सीमावादावर विधानसभेत मांडला जाणारा ठराव एक दिवसासाठी लांबणीवर पडला. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत नव्हे तर विधानसभेच्या कामकाजासाठी नागपूरमध्ये उपस्थित राहायला हवे होते, अशी टीका शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली.

शिखांचे धर्मगुरू गुरू गोविंद सिंग यांच्या दोन मुलांनी प्राणांचे बलिदान दिले, पण आपल्या स्वाभिमानाला धक्का लावू दिला नाही. त्यांच्या सन्मानार्थ वीर बाल दिवसानिमित्त दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला होता. े पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतील केंद्राच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण दिले होते. मी दिल्लीत नेमक्या कुठल्या कार्यक्रमाला आलो, याची माझ्यावर टीका करणाऱ्यांनी (उद्धव ठाकरे) माहिती घ्यायला हवी होती, असा टोमणा शिंदे यांनी मारला

कर्नाटक-महाराष्ट्रातील सीमावादावर तोडगा निघेपर्यंत बेळगाव व सीमाभाग केंद्रशासित प्रदेश घोषित केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावर, सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचे प्रकरण प्रलंबित आहे. तरीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या वादामध्ये हस्तक्षेप केला. दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून चर्चा केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सीमाभागात कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांना दिल्या, असे शिंदे म्हणाले.

सीमावाद ६० वर्षे जुना असून न्यायालयीन प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये, याची काळजी राज्य सरकार घेत असून कर्नाटक सरकारनेही घेतली पाहिजे. राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांनी बेळगाव व सीमाभागांसाठी असलेला मुख्यमंत्री धर्मादाय निधी बंद केला, अनेक योजना बंद केल्या. आम्ही या योजना पुन्हा सुरू केल्या आहेत. २ हजार कोटींचा निधी म्हैसाळच्या पाटबंधाऱ्याच्या विस्तारित प्रकल्पासाठी दिला आहे, असे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारवर टीका केली.

सत्तार यांच्यावरील आरोपांबाबत माहिती घेऊ

गायरान जमीन घोटाळय़ावरून राज्यातील मंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केल्याच्या मुद्दय़ावर, सत्तार यांच्या तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रकरणांचीही माहिती घेतली जाईल, असे शिंदे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply