ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

राज्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटातील दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दीपाली सय्यद बुधवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. या भेटीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे, नीलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली.

“मी येत्या तीन दिवसात शिंदे गटात प्रवेश करत असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आले आहे,” असं दीपाली सय्यद यांनी सांगितलं. तसंच जी जबाबदारी दिली जाईल, ती स्वीकारण्यास तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी संजय राऊतांवर खापर फोडलं. “संजय राऊतांना आपल्या पापाची शिक्षा झाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे या गोष्टी घडत गेल्या असून दोन वेगळे गट झाले आहेत. एकनाथ शिंदेंनीच मला शिवसेनेत आणलं असल्याने त्यांच्यासोबत उभं राहणं माझं कर्तव्य आहे”.

“रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. रश्मी ठाकरे खऱ्या सूत्रधार आहेत,” असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे.

“राजकारणात प्रत्येकजण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी येत असतो. पण जर काही कारणांमुळे पक्ष फुटत असेल तर मग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, काम कऱण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. ज्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्यासोबत गेलं पाहिजे,” असं दीपाली सय्यद यांनी सांगितलं.

“खोके म्हटलं जात आहे, त्यामागील खरं राजकारण समोर आलं पाहिजे. तसंच मुंबई महापालिका नेमकी कोणाच्या ताब्यात आहे हेदेखील कळलं पाहिजे,” असंही त्यांनी म्हटलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply