“केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा असं मी म्हटलं नाही” सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण

राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, अशा आशयाचं वक्तव्य भाजपा नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी याला विरोध केला होता. रझा अकादमीने देखील यावर तीव्र आक्षेप घेतला होता. वाढत्या विरोधानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण हॅलोऐवजी केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा, असं म्हटलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुनगंटीवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलं की, “रझा अकादमीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इंग्रजांनी किंवा विदेशातून आलेल्या ‘हॅलो’ शब्दाऐवजी ‘वंदे मातरम्’ शब्द वापरावा, हे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाचं सुरू केलेलं अभियान आहे. एखादा व्यक्ती ‘वंदे मातरम्’च्या तोडीचा शब्द वापरत असेल किंवा राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही.”

पुढे मुनगंटीवार यांनी सांगितलं की, “हॅलो, हा शब्द जर रझा अकादमीसाठी देशभक्तीची प्रेरणा देणारा असेल, तर प्रश्न उपस्थित नाही होत. शेवटी असा कोणताही कायदा केला नाही. आम्ही १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी दरम्यान सर्व देशभक्तांच्या माध्यमातून हे अभियान सुरू करत आहोत. ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्यवीरांच्या ओठांवरचे पवित्र शब्द आहेत. एका कवीने फार छान लिहिलंय, देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रापेक्षा स्वातंत्र्यवीरांच्या तोंडून निघालेले वंदे मातरम् हे शब्द आमच्यासाठी प्राणप्रिय आणि पवित्र आहेत.

“त्यामुळे अशा प्रकारचा कायदा केला जात नाही. ‘भारत माता की जय’ किंवा ‘वंदे मातरम्’ म्हणायचं की नाही? हे रझा अकादमीने ठरवावं. पण महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी लोकांपैकी बहुसंख्य लोकं हॅलो या शब्दाला पर्यायी शब्द ‘वंदे मातरम्’ वापरत असतील तर रझा अकादमीला कोणता शब्द वापरायचा आहे? हे त्यांनी ठरवावं” असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply