कल्याण येथील रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारत मोबाईल पळवला; रेकॉर्डवरील चोरट्याला अटक

कल्याण : लोकल व एक्स्प्रेस गाड्यांच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारत मोबाईल पळवणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोरख सन्या शिगवे असे या चोरट्याचे नाव असून या चोरट्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ५ ते ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

या चोरट्याने मंगळवारी २६ एप्रिल रोजी कसारा ते इगतपुरी स्थानकांदरम्यान एका तरुणाचा मोबाईल चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पकडला गेला. सोमनाथ धोत्रे हा १९ वर्षीय विद्यार्थी कल्याण ते इगतपुरी असा प्रवास करत होता. त्याची गाडी कसारा स्टेशनमधून निघत असताना सोमनाथ एक्सप्रेसच्या दारात बसून फोनवर बोलत होता. यावेळी ट्रॅकच्या बाजूला हातात काठी घेऊन उभ्या असलेल्या गोरख शिगवे याने सोमनाथच्या हातावर फटका मारला आणि त्याचा मोबाईल खाली पाडला.

हा मोबाईल घेऊन गोरख पळत असतानाच सोमनाथ आणि इतर प्रवाशांनी आरडाओरडा केला. ते ऐकून ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी चोराचा पाठलाग केला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. यानंतर त्याची झडती घेत त्याच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार चोरटा गोरख शिगवे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात आत्तापर्यंत ५ ते ६ गुन्हे दाखल आहेत. यानंतर प्रवाशांनी दारात बसून फोनवर बोलू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply