कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यातील एसटी सेवा विस्कळीत; प्रवाशांची गैरसोय

कर्नाटका- महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यातील एसटी सेवा वारंवार विस्कळीत होवू लागली आहे. या वादात प्रवाश्यांची गैरसोय होवू लागली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर कर्नाटकचा दावा सांगितल्यानंतर नव्याने वाद सुरु झाला. काल कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बोम्माई यांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली. त्यांनी बस स्थानकात जाऊन आंदोलन केले. यामुळे कर्नाटक -महाराष्ट्र दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक सेवा बंद झाली.

परिस्थिती लक्षात घेऊन शनिवारी सकाळी महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यातील परिवहन सेवा सुरू झाली. दुपारपर्यंत वाहतूक सुरू होती. यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला. दुपारी कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमा फाडून टाकल्या. बंगरुळूमधून पुढील आठवड्यात बेळगावला हजार कार्यकर्ते जातील आणि कन्नड जनतेचे रक्षण करू, असे आव्हानात्मक विधान संघटनेच्या प्रमुखांनी माध्यमांशी बोलताना केले. त्यांचा हा पवित्र लक्षात घेऊन दुपारनंतर पुन्हा दोन्ही राज्यातील वाहतूक बंद झाली.

दरम्यान कोल्हापूर वगळता जिल्ह्याच्या अन्य काही आगारांमधून कर्नाटकला एसटी सुरू होती. तर कर्नाटकातूनही महाराष्ट्रामध्ये बस येत होत्या. वाद पाहून प्रवाशी खाजगी वाहनाकडे वळले आहेत. अधिक दर आकारून ही वाहतूक सुरु होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply