उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

उल्हासनगर: उल्हासनगरात साडेचार वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील हनुमान नगर परिसरात २४ वर्षीय आरोपी (Accused) कांचनसिंग पासी आणि मृत मुलाचं कुटुंब वास्तव्याला आहे. पीडित मुलाची आई आणि कांचन सिंग हे दोघेही एका बिस्किटाच्या कारखान्यात एकत्र कामाला होते. १६ एप्रिल रोजी कांचनसिंग आणि मृत मुलाची आई यांच्यात किरकोळ कारणावरून भांडणं झाली.

यानंतर २० एप्रिल रोजी कांचनसिंग याने साडेचार वर्षांच्या या चिमुकल्याला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने आपल्या सोबत नेलं आणि अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात एका झाडाझुडपात नेऊन त्याची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह तिथेच टाकून कांचनसिंग हा उत्तर प्रदेशात त्याच्या मूळगावी जाण्यासाठी रवाना झाला. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याने मुलाच्या आई-वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली. तर दुसरीकडे अंबरनाथ पोलिसांना एका लहान मुलाचा मृतदेह ऑर्डनन्स परिसरात आढळून आला. हा मृतदेह अपहरण झालेल्या मुलाचाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

ज्यामध्ये मुलाच्या आईचं आरोपी कांचनसिंग याच्यासोबत ४ दिवसांपूर्वी भांडण झाल्याचं समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी कांचनसिंगचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेशात निघाल्याचे पोलिसांना समजले आहे. त्यामुळे उल्हासनगर पोलिसांच्या टीमने उत्तर प्रदेशात जाऊन प्रयागराज इथून कांचनसिंग पासी याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आपणच या साडेचार वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार त्याच्याविरोधात अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला सध्या ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply