पुणे : इंधन दरवाढीच्या विरोधात युवा सेनेचे मंचरला थाळी बजवा आंदोलन

मंचर: “केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अनोख्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष व केंद्र सरकारचे प्रतिकात्मक अभिनंदन युवासेनेच्या वतीने मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.३) छत्रपती शिवाजी महाराज चौकात थाळी बजाव आंदोलनाद्वारे करण्यात आले. इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी. ”अशी घोषणाबाजी थाळी वाजवत कार्यकर्त्यांनी केली. युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलक जमले होते. त्यांच्या भावना तीव्र होत्या.जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. तेथे झालेल्या सभेत युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले “महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही भाजप मात्र इतर राज्यातील निवडणुकीत मिळालेला विजय साजरा करण्यात मग्न आहे.दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. केंद्र सरकारला जाग येण्यासाठी युवासेना मैदानात उतरली आहे.” तालुका युवा अधिकारी वैभव पोखरकर, युवती सेनेच्या निलम गावडे यांची भाषणे झाली. उपजिल्हा युवासेना अधिकारी कल्पेश बाणखेले, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मालती थोरात, चिटणीस काळूराम लोखंडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सुनिल गवारी, रोहन कानडे, माऊली लोखंडे, स्वप्निल हिंगे, नविन भागवत, बजरंग देवडे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply