इंदापूर : तुकोबांची पालखी जिल्ह्यातून मार्गस्थ; पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात

इंदापूर : ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर ,आवडे निरंतर तेचि रूप इंदापूरकरांचा दोन दिवसांचा मुक्कामी पाहुणचार घेऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवारी सराटी (ता. इंदापूर) या पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामापासून मार्गक्रमण केले. पालखी सोहळा मंगळवारी (५ जुलै) सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे .

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, अरविंद गारटकर यांच्यासह इंदापूरकर मोठ्या संख्येने पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी गावकुसाबाहेर आले होते. मजल दरमजल करत अत्यंत उत्साहाने वैष्णव जणांनी गोकुळीचा ओढा येथे पहिली विश्रांती घेतली. दुपारच्या विश्रांतीसाठी बावडा येथे सोहळा आला. तोफा उडवून भक्तिमय वातावरणात बावडा ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले. दोन वर्षानंतर पालखी सोहळा येत असल्याने बावडेकरांचा आनंद द्विगुणीत झाला होता.

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक महादेव घाडगे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, विकास पाटील, अनिल पाटील, संग्रामसिंह पाटील, उमेश घोगरे, तुकाराम घोगरे, धैर्यशील पाटील, पवनराजे घोगरे आणि ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर बावडा ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन बाजारपेठेतून बाजारतळावर उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात आणली. माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी हजारो वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. बावडा येथील दुपारचा मुक्काम उरकून पालखीने रात्रीच्या मुक्कामासाठी सराटीकडे प्रस्थान ठेवले. बावडा ग्रामस्थांनी गावाच्या वेशीपर्यंत जाऊन पालखीला निरोप दिला.

पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आहे. मंगळवारी सकाळी पादुकांच्या नीरा स्नानानंतर हा सोहळा विठुरायाच्या पंढरीच्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. हरिनामाचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात तल्लीन होऊन भक्सिरसात न्हात वैष्णवांची पाऊले सराटीच्या दिशेने पडत असतानाच, मेघराजाने वैष्णवांवर जलधारांचा वर्षाव केला. हा सुखद अनुभव घेत सोहळा सराटी मुक्कामी विसावला. सराटी ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने सोहळ्याचे स्वागत केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply