“आज राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर २-३ रुपयांनी कमी केले, थोड्या दिवसात केंद्र सरकार…”; इंधन दरकपातीवर NCP ची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी इंधन दरकपात करण्याचे संकेत दिल्यानंतर आज इंधन दरकपातीची घोषणा करण्यात आली. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र या घोषणेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. आज राज्याचे दर कमी केले असले तरी केंद्र सरकार दरवाढ करेल तेव्हा आजच्या दरकपातीचा काही उपयोग झाला नाही हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल असं पाटील म्हणाले आहेत.

केंद्राने दरवाढ केल्यानंतर…
नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी इंधन दरकपातीवरुन शिंदे सरकारवर टीका केली. “शासनाने पेट्रोल डिझेलचे दर दोन रुपये, तीन रुपयांनी कमी केले आहेत. आज महाराष्ट्रात दोन आणि तीन रुपये दर कमी केले आहेत. थोड्या दिवसात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवेल त्यावेळी यांनी दर कमी करुन उपयोग झाला नाही हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल,” अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कितीपत योग्य आहे हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील
“केंद्र सरकार रोज किंमत वाढवतं. तर रोज किंमत कमी करणं हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी कितीपत योग्य आहे हे नवीन आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील,” असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आज इंधन दरकपातीचा निर्णय घेण्यात आला. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दरकपातीची घोषणा केली. यावेळी या दरकपातीमुळे राज्य सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरकपात जाहीर करताना शिंदे काय म्हणाले?
“केंद्र सरकारने ४ नोव्हेंबर २०२१ व २२ मे २०२२ रोजी पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात केली होती. त्यांनी राज्यांनादेखील कर कमी करण्याचे आवाहन केले होते. काही राज्यांनी केंद्राच्या सूचना मान्य करुन इंधनाचे दर कमी केले होते. मात्र राज्यात इंधनाचे दर कमी करण्यात आले नव्हते. आपल्या युतीच्या सरकारने ठरवलं आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळे आजपासून पेट्रोलचे पाच रुपये तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी दरकपातीचा निर्णय जाहीर करताना सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply