पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेशांसाठी महाविद्यालयांचे प्रमाणीकरण रखडले; प्रमाणीकरणासाठी महाविद्यालयांना २२ जूनची मुदत

पुणे : अनेक कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रमाणीकरण रखडल्याने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा अद्याप सुरू झालेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांना अर्ज निश्चितीसाठी २२ जून रोजी दुपारी बारा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली असून, या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

शिक्षण विभागाने यंदा दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करून वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची मुभा देण्यात आली. तर पुढील टप्प्यात राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे, महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र दहावीचा निकाल जाहीर होऊनही प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे आणि अन्य प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर कनिष्ठ महाविद्यालयांना प्रमाणीकरणासाठी २२जूनची मुदत देण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२२-२३साठी नोंदणी करणे, माहिती अद्ययावत करणे, प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य आहे. मात्र अद्याप अनेक महाविद्यालयांनी अर्ज अंतिम केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही. तसेच ज्या महाविद्यालयांनी सर्व आदेश अपलोड केलेले नाहीत, त्यांना पाठवण्यात आलेल्या त्रुटींच्या संदेशानुसार त्रुटी पूर्तता केलेली नाही. प्रमाणीकरण झाल्याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव संकेतस्थळावर दिसणार नाही, तसेच त्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply