अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “इतका आडमुठेपणा केला. काळजाववर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे ”

भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असून, ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर आज अखेर भाजपाने निवडणूक न लढवण्याचं जाहीर केलं. दरम्यान भाजपाने निर्णय जाहीर केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. भाजपाने आडमुठेपणा केला अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. आजच पत्र का दिलं? एक महिनाआधी का दिलं नाही? हा संपूर्ण वाद टाळता आला असता. ऋतुजा लटके यांना मानसिक त्रास झाल तो कसा भरुन काढणार? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

“आमचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार याचा आनंद आहे. पण भाजपाने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. लटकेंना ज्याप्रकारे राजीनामा देताना लटकवण्यात आलं होतं, ते लोक विसरु शकत नव्हते,” असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

“आमच्या पक्षप्रमुखांनी कायमच आपली परंपरा, संस्कृती आम्ही पाळत आलो असल्याचं सांगितलं आहे. दिवंगत व्यक्तीच्या मागे मुलगा, मुलगी, पत्नी कोणीही असलं तरी आपण त्यास मार्ग मोकळा करुन देतो. पण यावेळी भाजपाने फार आडमुठेपणा केला. काळजाववर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुरजी पटेल हे खोटं प्रमाणपत्र दिल्याने बाद झालेले उमेदवार होते. त्यामुळे सर्वांना ती कल्पना आली. हे उशिरा आलेलं शहाणपण आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरेंनी फेटाळली भाजपाची विनंती

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.

रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आमदार होण्याने रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखरीच शांती मिळेल. यामुळेच भाजपाने ही निवडणूक लढवू नये व त्यांच्या पत्नी निवडून येतील असे पाहावे, असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं.

राज ठाकरेंच्या पत्रानंतर फडणवीसांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजपा नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या होत्या. रविवारी रात्री फडणवीसांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते. भाजपाचं स्थानिक नेतृत्व ही जागा लढवण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी फडणवीस यांना कळवलं होतं. यानंतर सकाळीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply