आंबेगाव येथे ऊसाच्या फडात बिबट्याचे तीन बछडे आढळले

वळती ता. आंबेगाव येथील लोंढे मळ्यातील शेतकरी पंढरीनाथ नामदेव लोंढे यांच्या उसाची तोडणी सुरू असताना गुरुवार ता.१७ रोजी सकाळी पावणेसात वाजता ऊस तोड कामगारांना तीन बिबट्याचे बछडे आढळून आल्याची घटना घडली आहे. वळती गावानजीक लोंढे मळा असून सध्या या परिसरात ऊस तोडणीची कामे जोरात सुरू आहे. गुरुवारी (ता. १७ ) रोजी पंढरीनाथ नामदेव लोंढे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु झाल्यावर पावणे सात वाजण्याच्या सुमारास उसतोड कामगारांना सुरुवातीला एक बिबट्याचा बछडा आढळून आला. त्यानंतर आठ वाजता आणखी दोन बछडे आढळून आले हे बछडे साधारण दोन ते अडीच महिने वयाचे आहेत त्यानंतर ऊस तोडणीचे काम थांबविण्यात आले. बुधवारी (ता.१६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऊसतोड कामगार महिलांना याच शेतात बिबट्या दिसला होता त्यानंतर आज सकाळी तीन बछडे आढळून आल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. येथील देवराम शंकर लोंढे यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यावर पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला होता, या परिसरात एक-दोन नव्हे अनेक बिबट्यांचा वावर आहे अनेकांना बिबट्याचे दिवसा ढवळ्या दर्शन होत आहे. वनविभागाचा कर्मचाऱ्यांनी बिबट्यांच्या बछड्यांना सुरक्षित पणे अवसरी घाटातील वनसावित्री उद्यानात उपचारासाठी नेले आहे . ज्या ठिकाणी बछडे सापडले आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये अथवा सतर्क राहावे पिल्ले नसल्याने मादी आणखीन आक्रमक होऊन हल्ला करू शकते. त्यामुळे सर्वांनी दक्षता बाळगावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply