अवयवदानात पुणे ठरले अव्वल; देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

पुणे - पुणे शहर अवयवांचे दान (Organ Donate) करण्यात अव्वल ठरले आहे. याबाबत जनजागृती (Public Awareness) वाढल्याने रुग्णांचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश येत आहे. अवयव दानात देशपातळीवर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. ‘रोट्टो’ (रिजनल ऑर्गन अँण्ड टिश्यू ट्रान्सप्लँट ऑर्गनायझेशन) ‘सोट्टो’च्या (स्टेट ऑर्गन अँण्ड टिश्यू ट्रान्सप्लँट ऑर्गनायझेशन) राज्यातील आकडेवारीनुसार पुण्यात २०२१ मध्ये ११३ नातेवाइकांनी आपल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर अवयव दान करण्याची तयारी दर्शविली होती. त्यापैकी प्रत्यक्ष शंभर रुग्णांचे अवयव दान करण्यात आले. या दात्यांकडून ४१ यकृत, ४९ मूत्रपिंड, दोन हृदय आणि दोन लहान आतडे अशा अवयवांचा समावेश आहे. नागपुरात गेल्या वर्षी ५१ अवयव दान केले होते तर औरंगाबादमध्ये तीन आणि मुंबईत ही संख्या ९४ होती. राज्यात २०२२ मध्ये गेल्या आठवड्यापर्यंत आठ रुग्णांच्या नातेवाइकांनी अवयव दानास परवानगी दिली होती. जानेवारी आणि फेब्रुवारीत प्रत्येकी चार अवयव दान झाले आहेत. यात मोठ्या प्रमाणात मूत्रपिंड दानाचा समावेश आहे. अवयवदानात तमिळनाडू देशात अव्वल आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. गुजरात आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अवयव दानाबाबत प्रेरणादायी वृत्ती असूनही देणगीदारांच्या संख्येत मोठी तफावत आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी सातत्याने वाढत आहे. एकट्या पुण्यात दीड हजारांहून अधिक मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. याबाबत उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसते की, प्रत्येक वर्षी १.८ लाख नागरिकांचे मूत्रपिंड निकामी होते. परंतु प्रत्यारोपणाची संख्या केवळ ६ हजाराच्या दरम्यान आहेत. यकृताचे कार्य थांबल्याने दरवर्षी अंदाजे २ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. केवळ १ हजार ५०० प्रत्यारोपण होत आहेत. दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्णांना हृदयविकाराचा त्रास होतो. परंतु दरवर्षी केवळ १० ते १५ हृदय प्रत्यारोपण केले जाते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply