नागपूर: महाराष्ट्रात अवैध दारूचा महापूर; सव्वा तीन वर्षांतच लाखाहून अधिक गुन्हे

नागपूर: महाराष्ट्रात गेल्या सव्वा तीन वर्षांच्या कालावधीत अवैध दारूची विक्री आणि तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार या काळात एक लाखाहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मार्च २०२३ ते जून २०२६ या कालावधीत तब्बल १,००,०४८ गुन्हे नोंदवण्यात आले असून, यात ७२,६२० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एकीकडे शासन आणि उत्पादन शुल्क विभाग कडक कारवाया करत असताना, दुसरीकडे हे अवैध जाळे अधिकच विस्तारत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या सव्वा तीन वर्षांत एकूण २८९ कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा, रसायने, वाहने आणि उत्पादन यंत्रणा जप्त करण्यात आल्या आहेत. केवळ गावठी दारूच नव्हे, तर बनावट विदेशी मद्य, तस्करीतून आलेली दारू, तसेच मिथेनॉल आणि स्पिरिटसारख्या घातक रसायनांविरोधातही मोठ्या प्रमाणावर गुन्हे नोंदवले जात आहेत.

कारवाईचे आकडे:

२०२३-२४: २९,७२१ गुन्हे (६९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त)

२०२४-२५: ३०,१५२ गुन्हे (२२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त)

२०२५-२६: ३१,०२१ गुन्हे (१०२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त)

२०२६-२७ (जूनपर्यंत): ९,१५४ गुन्हे (२६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त)

राज्यभरात अवैध धंदे रोखण्यासाठी १६४ क्षेत्रीय कार्यकारी घटक, ५७ भरारी पथके आणि २७ सीमा तपासणी नाके अहोरात्र कार्यरत आहेत. असे असतानाही, कारवाई केल्यानंतर काही कालावधीतच हे नेटवर्क पुन्हा सक्रिय होत असल्याने, या अवैध मद्य व्यवसायाची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जप्तीचा वाढता आकडा आणि वारंवार होणाऱ्या कारवाया यावरून या व्यवसायाची मोठी आर्थिक व्याप्ती स्पष्ट होते.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *