पुणे: धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने पाणीकपातीचा निर्णय तूर्तास लांबणीवर

पुणे: पालखी सोहळ्याच्या मुक्कामामुळे पुण्यातील दिवसाआड पाणीकपात स्थगित करण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात झालेला मुसळधार पाऊस आणि धरणसाठ्यात झालेली मोठी वाढ लक्षात घेता पुणे महापालिकेने तूर्त पाणीकपात लागू न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा 'एल निनो' सक्रिय असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा ४ टीएमसीपेक्षा कमी झाल्याने महापालिकेने १५ जूनपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थिती बदलली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, विशेषतः घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला साखळीतील पाणीसाठा १६.६४ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या मुक्कामामुळे १२ जुलैपर्यंत पाणीकपात रद्द केली होती. ही मुदत आज (रविवार) संपत असली तरी, धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याने सोमवारपासून पुन्हा पाणीकपात होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत पुन्हा पाणीकपातीचा अधिकृत निर्णय होत नाही, तोपर्यंत शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू राहील. जुन्या वेळापत्रकानुसार पाणीकपात पुन्हा सुरू न करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून, पाणीकपातीचा अंतिम निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल.

 



शहर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *