पाकिस्तानी गँगस्टरशी सोशल मीडिया कनेक्शन! 'एटीएस'चा कोल्हापूर, मुंबईसह राज्यभरात एकाच वेळी छापा; ११२ तरुणांची कसून चौकशी!

पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर आणि आयएसआय (ISI) हँडलर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट संपर्कात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संपूर्ण राज्यात एकाच वेळी मोठी धरपकड मोहीम राबवली आहे. एटीएसच्या एकूण १४ पथकांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून मुंबई, कोल्हापूर, सांगली, ठाणे, आणि नागपूरसह विविध जिल्ह्यांत ११२ संशयित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे राज्यभरात आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

शहजाद भट्टीकडून सोशल मीडियावरून तरुणांना 'फुस'

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून ड्रग्ज आणि अंडरवर्ल्ड नेटवर्क चालवणारा शहजाद भट्टी हा सध्या भारतीय तरुणांना टार्गेट करत आहे. तो बंदी घातलेल्या मेसेजिंग ॲप्स आणि फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतीय तरुणांना देशविरोधी कारवायांमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच दिल्ली आणि पंजाबमधून भट्टीच्या काही साथीदारांना अटक केली होती, ज्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब आणि शस्त्रे जप्त करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतूनच महाराष्ट्रातील या मोठ्या नेटवर्कचा सुगावा लागला.

कोल्हापूर आणि सांगलीत गोपनीय छापे; १० तासांची कसून चौकशी

एटीएसच्या मुंबई आणि स्थानिक युनिटने कमालीची गुप्तता बाळगत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील संशयितांच्या घरांवर छापे टाकले. कोल्हापुरातील तरुणांची एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तब्बल १० तास कसून चौकशी केली. त्यांच्या मोबाईलची तांत्रिक पडताळणी (Cyber Forensic Verification) करण्यात आली असून, त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या संदेशांना काय उत्तरे दिली किंवा त्यांचे काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचा तपास केला जात आहे. चौकशीनंतर या तरुणांना सध्या 'शहर न सोडण्याच्या' अटीवर आणि चौकशीला सहकार्य करण्याच्या नोटिसा देऊन सोडण्यात आले आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर; पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन

एटीएसच्या या धडक कारवाईनंतर कोल्हापूर आणि मुंबईतील जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेनवॉश करण्याचे पाकिस्तानचे नवे 'डिजिटल' कारस्थान या कारवाईमुळे उघड झाले आहे. सोशल मीडियावर अनोळखी परदेशी व्यक्तींशी संपर्क ठेवू नये, तसेच आक्षेपार्ह रिल्स किंवा मेसेज फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले आहे. या आंतरराष्ट्रीय नेटवर्कची पाळेमुळे शोधण्यासाठी एटीएसचा तपास अद्यापही वेगाने सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *