मुंबई: हुतात्मा दिनी राज्यातील रेल्वे स्थानकांवर वाजवा महाराष्ट्र गीत; मराठी अभ्यास केंद्राचे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला निवेदन

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या छटपूजेनिमित्त राज्यातील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर आता महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आगामी २१ नोव्हेंबरला म्हणजेच 'हुतात्मा दिनी' महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर 'महाराष्ट्र गीत' आणि राज्यगीत वाजवण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात 'मराठी अभ्यास केंद्रा'च्या वतीने रेल्वे मंडळ, रेल्वे मंत्रालय तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला अधिकृतपणे निवेदन देण्यात आले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी २१ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबईत काढण्यात आलेल्या ऐतिहासिक मोर्चावर झालेल्या गोळीबारात अनेक आंदोलक हुतात्मा झाले होते. या वीर हुतात्म्यांच्या बलिदानाची आणि शौर्याची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत रेल्वे स्थानकांवर विशेष उद्घोषणा (Announcements) करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. स्थानकांच्या ध्वनिक्षेपकावरून ठराविक वेळाने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे अधिकृत राज्यगीत आणि 'बहु असोत सुंदर संपन्न की महा' हे प्रसिद्ध महाराष्ट्र गीत वाजविण्यात यावे, असे केंद्राने सुचवले आहे.

केवळ गाणी वाजवून रेल्वे प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, तर हुतात्मा दिनाचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि १०७ हुतात्म्यांच्या अमूल्य योगदानाची माहिती शोधून ती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने करावे, अशी आग्रही मागणी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि कार्यवाह आनंद भंडारे यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या रेल्वे जाळ्यावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे प्रवाशांमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव निर्माण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य निर्देश द्यावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *