पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!

पुणे: शहरात एमपीएससी (MPSC) आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची आणि विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा मुख्य चेहरा आणि प्रमुख वक्ता म्हणून समोर आलेले तरुण नेते विवेकानंद पाटील यांनी भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडून सुरू असलेल्या टीकेचा आणि आरोपांचा अत्यंत आक्रमक शब्दांत खरपूस समाचार घेतला आहे. उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असली, तरी जोपर्यंत MPSC आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन असेच सुरूच राहील, अशी ठाम भूमिका विवेकानंद पाटील यांनी यावेळी बोलताना घेतली आहे. सरकारने आणि प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय आहेत भाजपचे आरोप आणि नवनाथ बन यांचे विधान? पुण्यातील या MPSC आंदोलनाबाबत भाजपच्या वतीने सुरुवातीपासूनच गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक पत्रकार परिषद घेत, या आंदोलनावर जोरदार टीका केली होती. आंदोलनाच्या नावाखाली मध्यरात्री केल्या जाणाऱ्या धांगडधिंग्याचे आणि काही मद्यपान केल्याचे व्हिडिओ आपल्या हाती लागल्याचा दावा करत, हे विद्यार्थ्यांचे नसून पूर्णपणे राजकीय प्रेरित आंदोलन असल्याचा घणाघात नवनाथ बन यांनी केला होता. तसेच, हे आंदोलन नेमके कोण चालवत आहे आणि नाईटलाईफच्या नावाखाली तिथे नेमके काय सुरू आहे, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

"तो उकीरडा बुद्धीचा माणूस आहे" - विवेकानंद पाटलांचा पलटवार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हे राजकीय आंदोलन असल्याचा दावा करत केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना विवेकानंद पाटील प्रचंड आक्रमक झाले. नवनाथ बन यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले की, "तो उकीरडा बुद्धीचा माणूस आहे, तो रोज नवनवीन आरोप करत सुटत असतो. नवनाथ संप्रदायातील नऊ नाथ नेमके कोणते आहेत आणि भागवत संप्रदायासोबत नवनाथ संप्रदायाचा संबंध काय आहे, हे जर त्याला विचारले तर तो काय उत्तर देईल?" असे म्हणत त्यांनी नवनाथ बन यांच्या बौद्धिक कुवतीवर आणि ज्ञानावर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, राजकीय पातळीवर होणाऱ्या या टिकेला काळच योग्य उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आयोगाच्या प्रतिकात्मक अंत्यविधीची आणि राखेच्या विसर्जनाची घोषणा: या आंदोलनादरम्यान MPSC आयोगाचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रतिकात्मक अंत्यविधी केला होता, आणि आता त्या राखेचे विसर्जन केले जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या राखेतील काही भाग आयोगाकडे पाठवला जाईल आणि काही भाग नदीत विसर्जित केला जाईल, जेणेकरून ही राख बघून तरी आयोगाच्या अध्यक्षांना आत्मपरीक्षण वाटेल आणि ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. जोपर्यंत राजीनामा होत नाही, तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही, यावर त्यांनी पुन्हा एकदा जोर दिला.

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल: दुसरीकडे, पुण्यातील या चालू असलेल्या MPSC आंदोलनावर आज मुंबई उच्च न्यायालयात (High Court) महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले. आंदोलन करणारे विद्यार्थी काही समाजविघातक (Anti-social) किंवा गुन्हेगार नाहीत, तर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा त्यांचा लोकशाही अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पुण्यासारख्या शहरात विद्यार्थी केवळ शिक्षणासाठी येतात, त्यांना आंदोलनाची कोणतीही आवड नसते. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांचा हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, असा मोलाचा सल्ला न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

विश्वजीत कदमांच्या घराच्या घोषणेवर विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया: काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी विवेकानंद पाटील यांची अत्यंत हलाकीची घरची परिस्थिती पाहून त्यांना नवीन घर देण्याची घोषणा केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना विवेकानंद म्हणाले की, विश्वजीत कदमसाहेबांनी माझ्या आई-वडिलांची मुलाखत पाहिली आणि त्यांना माझी परिस्थिती समजली. परंतु, मी माझ्या गरिबीचे कधीही भांडवल करणार नाही. मी कदमसाहेबांच्या घराच्या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला आहे. मला फक्त जनतेच्या आणि नेत्यांच्या पाठीवर हात हवा आहे. मी अवघ्या २४ वर्षांचा तरुण असून, लाथ मारेल तिथून पाणी काढण्याची माझी तयारी आहे, असे सांगत त्यांनी आपला स्वाभिमानी बाणा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *