एन. रघुरामन यांचा कॉलम:काही दृश्ये आपल्या आठवणीत कायमची कोरली जातात, ती चित्रित केली जात नाहीत

जीवनात काही दृश्ये अशी असतात, जी चित्रित करण्याची गरज नसते. ती फक्त तिथे घडत असतात आणि आपण ती फक्त पाहत असतो. तरीही ती अनेक वर्षे, कधी कधी तर आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. तेदेखील असेच एक दृश्य होते. मी ते कधीही विसरू शकणार नाही. 1995 साल होते. मी कामावरून नुकताच घरी परतलो होतो. तेव्हा मी माझ्या साधारण चार वर्षांच्या मुलीला एकटीलाच बोर्ड गेम खेळताना पाहिले. ती बोर्डच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत उड्या मारत होती. कधी ती स्वतःच्या बाजूने खेळायची, तर कधी तिच्या काल्पनिक जोडीदाराच्या बाजूने. ते एक असे दृश्य आहे, जे मी कधीच विसरू शकत नाही. माझे डोळे पाणावले. काही काळापूर्वीपर्यंत दिवसभर तिच्यासोबत खेळण्यासाठी तिला एक जोडीदार असायची. पण गेल्या दोन महिन्यांपासून ती तिच्यासोबत नव्हती. ती तिची आजी होती. आता ती चिमुरडी एकटीच उरली होती. मी लगेच साबणाने हात धुतले, फरशीवर बसलो आणि तिच्यासोबत खेळू लागलो. तिचे पूर्ण लक्ष बोर्डवर होते. प्रत्येक वेळी फासा फेकताना ती उत्साहाने किंचाळायची. मीदेखील तिच्यासोबत ओरडायचो, पण माझा शर्ट हळूहळू अश्रूंनी भिजत होता. माझ्या पत्नीने अचानक स्वयंपाकाचे काम आवरले आणि दोन बाऊल घेऊन ती आमच्या जवळ येऊन बसली. जेवण तेच होते - दही-भात - पण दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे बनवले होते. मुलीच्या बाऊलमधील दही-भात चांगला कुस्करलेला होता, तर माझ्या बाऊलमध्ये आणखी काही गोष्टी मिसळल्या होत्या. आम्हा दोघांनाही वारंवार फासा फेकायचा होता, त्यामुळे हाताने जेवणे शक्य नव्हते. तेव्हा माझ्या पत्नीने ठरवले की, ती आपल्या मुलीला आणि नुकतीच आई गमावलेल्या अशा एका 35 वर्षांच्या मुलाला - दोघांनाही स्वतःच्या हाताने भरवेल. प्रत्येक वेळी जेव्हा मुलीला घास भरवला जायचा तेव्हा आम्ही टाळ्या वाजवायचो. प्रत्येक वेळी जेव्हा पत्नी मला घास भरवायची तेव्हा आमची नजर मिळायची. तिचे डोळे जणू सांगत होते, ‘मला तुझी वेदना समजतेय. प्लीज शांत हो.’ पण ज्याला भरवले जात होते त्याच्या डोळ्यांत न सांगता येणारी वेदना होती. मला माहीत नाही, कोणती वेदना जास्त होती. ती आईला गमावण्याची वेदना होती की त्या निरागस मुलीला एकटीला खेळताना पाहण्याची वेदना, जिला हेच माहीत नव्हते की तिची लाडकी जोडीदार आता कधीच परत येणार नाही? की त्या पित्याची भीती जास्त मोठी होती, जो विचार करत होता की, जर मुलीने अचानक विचारले, ‘माझी जोडीदार कधी परत येईल?’ - तर तो काय उत्तर देईल? माझ्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. कदाचित आमच्यापैकी कोणाकडेच नव्हते. त्या संध्याकाळचा तो बोर्ड गेम, फासे, दही-भात, एकमेकांना भरवणे आणि डोळ्यांच्या त्या मूक भेटी, हे सर्व त्या नुकसानीला सामोरे जाण्याचा आमचा मार्ग बनला होता. ही एक अशी हानी होती, जी आमच्यापैकी कोणीही शब्दांत मांडू शकत नव्हते. त्या प्रेमाचा, स्पर्शाचा, एकमेकांना भरवण्याचा आणि नजर मिळण्याचा परिणाम खूप साधा होता. अश्रू. फक्त अश्रू. शुक्रवारी रात्री मला हे सर्व आठवले, जेव्हा मी एका अशा कार्यक्रमात होतो, जिथे तीन वेगवेगळ्या जगांतील तीन दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या - अमिताभ बच्चन, गुलजार आणि सचिन तेंडुलकर. एक भारतीय चित्रपटसृष्टीचा आवाज आणि चेहरा आहे, दुसरे तिचे कवी-तत्त्वज्ञ आहेत आणि तिसरे क्रिकेटचे सर्वात लाडके तारे आहेत. पण तो कार्यक्रम चित्रपटांबद्दल नव्हता, कवितेबद्दल नव्हता आणि क्रिकेटबद्दलही नव्हता. तो भावनांनी भरलेला होता आणि मी तिथली अनेक दृश्ये माझ्या मनात साठवली. फंडा असा आहे की, आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व असणारी माणसे सर्वात मोठ्या मंचावर उभी असतीलच असे नाही. ती तुमच्या शेजारी बसलेली छोटी मुलेही असू शकतात, जी तुमचे लक्ष वेधून घेण्याची वाट पाहत असतात. तुम्ही आयुष्यात कितीही उंचीवर पोहोचलात तरी यशाची खरी कसोटी हीच असते की, तुम्ही आजही खाली वाकून एखाद्या लहान मुलाचा हात धरू शकता का?

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *