Weather Report : मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी; ठाण्यात झालंय धुळीचं साम्राज्य, वरुणराजामुळे शेतीचं नुकसान

Mumbai Rain : होळी सणात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल मुंबईकरांनी देखील या पावसाचा आनंद घेतला. मुंबईत काल काही उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. तसचे काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता. काही उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काल ठाणे, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, वांगणी या उपनगरांमध्ये पाऊस पडला आहे. 

सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास ठाण्यात सोसाट्याचा वारा सुटला होता. वाऱ्यामुळे शहरात सर्वत्र धूळ पसरली होती. वाहनांचा धूर आणि धूळीमुळे हवेची गुणवत्ता आणखीन खालावलेली दिसली. तसेच कल्याणमध्ये रीमझीम पावसाच्या सरी बरसल्या. यासह बदलापूरमध्ये देखील सोसाट्याचा वारा सुटला होता.

हवामान खात्याकडून येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय.आज राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली. दुपारी चारनंतर अचानक सोसाट्याच्या वारा सुटला होता .वाऱ्यासोबत धूळ ही हवेत उडाल्याने कल्याण डोंबिवलीत धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं तर मध्य रात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली होती.अचानक कोसलेलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कुठे हलका तर कुठे मोठा पाऊस पडत आहे. यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठण, गंगापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी, कांदाचे मोठे नुकसान होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळवारा आणि विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस आणि गारा पडल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी परिसरात आज जोरदार गारपीट झाली असून या अवकाळी पावसामुळे गहू कांदा हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अस्मानी संकटाने हिरावून नेला आहे. तसेच नगर जिल्ह्यातील नगर तालुका परिसरातही जोरदार वारा आणि पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या नुकसानी बाबतचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाने केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply