Wafgaon Fort : पुणे परिसर दर्शन : वाफगावचा किल्ला

Wafgaon Fort : मल्हारराव होळकर हे आधी सरदार दाभाडे यांच्या एका पेंढारी टोळीत होते, त्यांची थोरले बाजीराव यांच्याशी भेट झाली अन् मैत्री जुळली. पराक्रमी अशा मल्हाररावांना बाजीरावांनी मळव्याची सुभेदारी दिली. सुभेदार मल्हारराव यांना जुन्नर भागातील वडगावची जहागिरी मिळाल्यानंतर त्यांनी १७४९ मध्ये येथे भुईकोट किल्ला बांधला. पूर्ण गावाला तटबंदी केली.

मात्र, आज ती पडली आहे. पण प्रवेशद्वार अजून चांगल्या स्थितीत आहे. आत गेल्यावर डाव्या बाजूने पुढे मजबूत तटबंदी असलेला राजवाडा आहे. त्याचे प्रवेशद्वारसुद्धा किल्ल्यासारखेच मजबूत आहे. तटबंदी चांगल्या स्थितीत आहे.

प्रवेशाच्या अलीकडे राजराजेश्वर मंदिर असून, ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधले आहे. मुख्य राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी २५ ते ३० फुटी भव्य दरवाजा आहे. दरवाज्याच्या बाजूला कमळ आणि इतर फुले कोरलेली आहेत. दरवाजाबाहेर उजव्या बाजूला चुन्याचा घाणा त्याच्या भल्यामोठ्या चाकासह चांगल्या स्थितीत आहे.

राजवाडा आता रयत शिक्षण संस्थेला शाळा चालविण्यासाठी दिला आहे. वाड्यात राणी महाल आहे. आत संगमरवरी विष्णू लक्ष्मी गरुडावर आरूढ अशी मूर्ती असलेले मंदिर आहे. राणी महालात होळकर काळातील लाकडी काम अजूनही बघायला मिळते. जवळच किल्ल्यातील दोन बांगडी तोफा आहेत. राणी महलासमोर एक मोठी बारव आहे. इंग्रजी L आकारात पायऱ्या उतरत जाऊन आत पाणीसाठा आहे. तिथेच एक छोटेसे लक्ष्मी विष्णू मंदिर आहे.

येथून तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटाला सात बुरूज आहेत. एका बुरुजात खोल गेलेली अंधारी विहीर आहे. त्याला तटातून जायला वाट आहे. मुख्य राजवाडा प्रशस्त आहे. आता तीन मजली भिंती शिल्लक आहेत. बाकी सर्व बांधकाम काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले आहे. वाड्याचे प्रवेशद्वार एका कोपऱ्यात आहे. आत गेल्यावर वाड्याची भव्यता जाणवते. सर्व बाजूंनी तीन मजली सज्जे, त्यात जिने आणि देवळ्या आहेत. बाकी वाड्याच्या बांधकामाला तडे गेले आहेत. एक तळघर आहे, त्यात अनेक खोल्या आहेत. पेशवे आणि होळकरकालीन भव्यता अनुभवायची असेल, तर वाफगावला एक भेट देणे आवश्यक आहे.

काय पहाल?

प्रवेशद्वार, राजराजेश्वर मंदिर, राजवाड्याचे प्रवेशद्वार, राणी महाल, बारव, अंधार विहीर, तटबंदी, राजवाडा, दोन तोफा, लक्ष्मी विष्णू मंदिर, दरवाजात चुन्याचा घाणा.

कसे पोहचाल

राजगुरुनगरहून वाफगावला बसने जाता येते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply