Unseasonal Rain : नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपलं; शेतीचं मोठं नुकसान

Unseasonal Rain  : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर, अमरावती,यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. आज दुपारी नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी आहे.

नागपूरच्या काही भागात रिपरिप तर काही भागात मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाने आधीच विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहिसा दिलासा मिळाला आहे. परिसरात तापमानातही घट झाली आहे. आणखी पुढील तीन दिवस देखील पावसाचा अंदाज आहे.

वाशिममध्ये पावसाची हजेरी

वाशिम शहरासह जिल्ह्यातील मंगरुळपीर कारंजा, मानोरा तालुक्यातील कारखेडा, चिखली वरोली परिसरात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी जोरदार गारपीट आणि मुसळधार पाऊस पडल्यानं गहू, ज्वारी, भाजीपाला पिकांचे आणि आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चिखली परिसरातील अनेक घरांच्या छतावरील टिन पत्र्यांचं गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी गारपीट

यवतमाळ जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाने झोडपलं. आर्णी, बाभूळगाव पुसद, महागाव आणि उमरखेड तालुक्यातील काही गावामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुसद बाबुळगाव या तालुक्यातील काही गावांना गारपिटही झाली. वेणी येथे केळीच्या बागेचे अवकाळीमुळे नुकसान झाले. 

पुसद तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली. पांढुर्णा आणि बेलोरा या गावांत पावसाच्या सरी कोसळल्या आणि गारपिटीचा देखील फटका बसला आहे. गेल्या पंधरा दिवसात अवकाळी पावसाने चार वेळा जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरातीतही पावसाची हजेरी

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातमध्ये वादळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी लावली. जिल्ह्यतील भाजीपाला, फळ पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अमरावती शहरातही जोरदार पावसाने हजेरी लावली.

जालन्यात अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतीचं नुकसान

जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह मोसंबी, आंबा फळबागांना मोठा फटका बसला आहे. उन्हाळी हंगामातील टरबूज,खरबूज आदी पिकांना मोठा फटाका आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळालेली नाही आणि त्यात आजही गारपीटीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply