Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा कहर; जालना, रायगडमध्ये येलो अलर्ट, वीज पडून दोघांचा मृत्यू

Maharashtra Unseasonal Rain : राज्यात दोन आठवड्यांपासून सुरु असलेला अवकाळीचा कहर अजूनही सुरूच आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. दरम्यान राज्यात २५ मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून जालना व रायगड जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान काल जालन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून वि पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.

जालना जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू जालना : जालन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील झाडे उखडून पडली आहे. यात रविवारी जिल्ह्यात विज पडून दोघांचा दुर्दैव मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जालन्यातील सराटे वझर शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडे पडली आहेत. तर भोकरदन तालुक्यातील भायडी शिवारात वीज पडून रामदास फड यांचा मृत्यू झाला. तर केदारखेडा येथील राहुल जाधव या तरुणाचा देखील वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान पुढील चार दिवस हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

अमरावती जिल्ह्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले आहे. अमरावतीच्या वरूड, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, धारणी तालुक्यासह इतरही भागात वादळी वारा आणि पाऊस होत असून पावसामुळे पुन्हा एकदा कांदा, केळी, संत्रा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेड बाजार, चिंचोना, डोंगरावर परिसरात केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

वादळी वाऱ्याने घराची पत्रे उडाली

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील पूर्व भागातील संख, गोंधळवाडीसह परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह हा अवकाळी पाऊस पडला आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोंधळेवाडी, गुड्डडापूर,असंगीतुर्क परिसरातील रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली होती. तसेच अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेल्याचा प्रकार घडला आहे. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. दरम्यान रस्त्यावरून पडलेली अनेक झाडे तुकाराम बाबा महाराज यांच्या माध्यमातून रात्रभर प्रयत्न करून हटवण्यात आली.

रत्नागिरीत सकाळीच अवकाळी पावसाची हजेरी रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे हवामान खात्याने अवकाळीची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा निर्माण झाला.

लोहारा, उमरगा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

धाराशिव : धाराशिवच्या लोहारा, उमरगा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी झाडे तुटुन पडली आहेत. तर विजेच्या तारा देखील तुटल्या आहेत. कास्ती खुर्द या गावात शेतात झाड पडुन शेतकऱ्याची म्हैस दगावली. तर लोहारा शहरातील झिंगाटे प्लॉटमध्ये घरासमोर झाड पडुन कारचे नुकसान झाले. जवळपास तासभर झालेल्या पावसाने कांद्यासह फळ पिकांचे व भाजीपाल्याचे देखील नुकसान झाल आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply