Union Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प समजून घ्या महाराष्ट्राचे CM फडणवीस आणि DCM शिंदे यांच्या नजरेतून; वाचा काय म्हणाले...

 

New Delhi: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केलं. मध्यम वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले असताना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.

फडणवीस म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मध्यम वर्गासाठी एक चांगला असा अर्थसंकल्प मांडला आहे. अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. सात लाखांची असलेली मर्यादा थेट १२ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. त्यामुळे आता १२ लाख उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर(Tax) भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा मध्यम वर्गीय, नोकरदार आणि तरुणांना होणार आहे. यामुळे मोठे उत्पन्न मध्यमवर्गींच्या खिशात येणार आहे".

"पहिल्यांदा केंद्र सरकारने तेलबियांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. १०० टक्के खरेदी केंद्र सरकार हमीभावाने करणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्याकरता मोठा फायदा होणार आहे. मासेमारी करणाऱ्यांकरता देखील तीन लाखांची क्रेडीट लिमिट पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे".

Nirmala Sitharaman Budget Saree : निर्मला सीतारामन यांच्या साडीनं वेधलं लक्ष, पांढऱ्या सोनेरी बॉर्डरच्या साडीचं आहे बिहार कनेक्शन

"हे उत्पन्न खर्च करताना देशातील मागणी वाढेल. ज्याचा थेट फायदा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उत्पादनांना होईल. यातून रोजगार निर्मितीही होईल. या अर्थसंकल्पात धीराने आणि धाडसाने घेतलेला निर्णय भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरेल", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळात बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील, आता घरोघरी लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटणार, तसेच एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असं म्हटलं आहे.

“केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांहून १ लाख करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील ३६ जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार आहेत.

मोबाईल(Mobile) फोन देखील स्वस्त होणार असल्याने देशातील प्रत्येक घराला, व्यक्तीला या निर्णयाचा लाभ होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार,” असं म्हणत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply