Sharad Pawar News : शरद पवारांच्या घोषणेनंतर ठाकरे गटात चलबिचल; उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर जाणार

Uddhav Thackeray Met Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. शरद पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का देऊन गेला.

पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते भावूक झाले. साहेब आपण तातडीने आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी नेत्यांकडून करण्यात आली. मात्र, शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकवर जाणार असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. तसेच त्यांच्याकडे महाविकास आघाडीचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून सुद्धा बघितलं जात आहेत.

अचानक पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीचे नेतृत्व कोण करणार? महाविकास आघाडीची वज्रमुठ कोण घट्ट करणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सिल्वर ओकवर जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा पवारांच्या राजकीय निवृत्तीबाबत सूचक ट्विट केलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, “१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.”  

“सार्वजनिक जीवनातील १ मे, १९६० ते १ मे, २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल,” असं शरद पवार यांनी जाहीर केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply