Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाआधी सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुंबई : शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. मात्र त्याआधी सुप्रीम कोर्टाने आधी 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढावा, त्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टात १४ फेब्रुवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे.

जनतेच्या मनता संभ्रम आहेत. शिवसेनेचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेनेचे दोन गट मी मान्य करत नाही. शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार आहे. शिवसेना आमचीच आहे. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

सुप्रीम कोर्टाच्या निकालात 16 आमदार अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. घटनातज्ञ आणि घटनेत नमूद केल्याप्रमाणे त्याचा निकाल आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने काय करावं हे सांगण्याचा आमचा हेतू नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

आमच्याकडे जास्त आमदार खासदार आहेत मग आम्हीच पक्ष आहोत हा दावा चुकीचा आहे. पक्ष केवळ विधीमंडळ आणि संसदीय लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर देशातील उद्योगपती पक्ष फोडून सरकार स्थापन करतील आणि पंतप्रधान बनतील. त्याला गद्दारी म्हणतात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

कोणताही पक्ष जनतेच्या पाठिंब्याने स्थापन होतो. निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद आहे. शिवसेनेची निवडणूक घेण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. आम्हाला आयोगाने परवानगी अद्याप दिलेली नाही. ती मिळाली की निवडणुका घेतल्या जातील किंवा आता परिस्थिती आहे ती पुढे तशीच ठेवावी, अशी विनंतीही उद्धव ठाकरेंनी आयोगाला केली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply