Udayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका; म्हणाले, “इतिहासात…”

Udayanraje Bhosale : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहित रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली. यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी ३१ मे पर्यंतची मुदत देखील दिली. दरम्यान, यानंतर धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास विरोध दर्शविला. यानंतर यासंदर्भात अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. आता याबाबत भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची एक समिती नेमण्याची मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच इतिहासात अशी कोणतीही नोंद नाही, असंही उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

खासदार उदयनराजे भोसले काय म्हणाले?

“आपण सर्वजन राहत असलेल्या स्वराज्याची संकल्पना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडली. सर्वधर्मातील लोकांना एकत्र केलं, एवढंच नव्हे तर राज्यकारभारत लोकांचा सहभाग असावा यासाठी त्यांनी संकल्पना मांडली. खरं तर देव आपण कधी पाहिला नाही, मी तरी आजपर्यंत पाहिला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने त्या काळातील लोकांना देव पाहायला मिळाला. मात्र, आज दुर्देव आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले जातात”, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

“आज खरंच समाज एवढा विकृत झाला आहे का? आपण हा अपमान किती काळ सहन करणार? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत विशेष कायदा करण्याची मागणी केली आहे. मी याआधीच सांगितलं होतं की विशेष कायदा पारित करा. सर्व राजकीय पक्षांना सांगून देखील कायदा पारित केला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच असं वाटतं का की अशा प्रकारे अवमान झाला पाहिजे? लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यपद्धतीमधून सिद्ध करून दाखवलं पाहिजे. कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

‘शासन मान्य इतिहास का प्रकाशित झाला नाही?’

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही आधारस्तंभ मानता ना? मग अजून त्यांचा शासन मान्य इतिहास प्रकाशित का झाला नाही? अनेक महापुरुषांचा शासन मान्य इतिहास मान्य झाला. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनाच विसरलात?”, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला. “तसेच मराठ्यांच्या ज्या राजधान्या होत्या, राजगड असेल किंवा रायगड असेल किंवा सातारा, यासाठी एक शिव स्वराज्य सर्केट स्थापन केलं पाहिजे”, अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली.

‘तात्काळ कायदा पारित करावा…’

“सर्व पक्षातील लोकांनी एकदा ठरवावं आणि एक विशेष अधिवेशन बोलवून तात्काळ कायदा पारित करावा. तरच विकृत लोकांवर आळा बसेल. मला सांगा हा कायदा जर बनवला गेला तर प्रशांत कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूर असेल, हे अशा प्रकारे काही बोलण्याचं धाडस करतील का? पण कायदा बनवला जात नाही म्हणून हे लोक बोलतात”, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत मांडली भूमिका

वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातील तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार उदयनराजे भोसले यांना विचारला. यावर बोलताना ते म्हणाले, “वाघ्या, वाघ्या, कोण वाघ्या? येथे एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत एक इतिहासकारांची समिती नेमली पाहिजे. मग ती समाधी तिथे कधी आली? का आली? इतिहासात तर अशी नोंद नाही. काहीका असेना. पण त्या माध्यमातून योग्य तो निर्णय घ्यावा”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply