पुणे :  प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून ; प्रेम प्रकरणाचा संशय; महिलेसह चौघांवर गुन्हा

पुणे : प्रेम प्रकरणातून एका तरुणावर शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरच्या मैदानावर घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गिरीधर उर्फ गिरीश उत्तरेश्वर गायकवाड (वय २१, रा. साई टॉवर, घुले पार्क, मांजरी ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी साक्षी पांचाळ हिच्यासह चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीधरचा भाऊ निखीलकुमार (वय २७) याने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गिरीधरचे वडील अमरावतीतील मध्यवर्ती कारागृहात अधिकारी आहेत. मंगळवारी (२४ मे) रात्री दहाच्या सुमारास निखील, त्याची पत्नी, आई आणि भाऊ गिरीधर घरी होते. त्या वेळी गिरीधरच्या मोबाइल क्रमांकावर आरोपींनी संपर्क साधला आणि त्याला भेटीसाठी बोलावले. त्यानंतर गिरीधर घरातून बाहेर पडला. मध्यरात्रीपर्यंत तो घरी परतला नाही. निखीलने त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्याचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले.

दरम्यान, आरोपींनी ग्लायडिंग सेंटरच्या मैदानावर गिरीधरवर शस्त्राने वार करून त्याचा खून केला होता. रात्री ग्लायडिंग सेंटरच्या आवारातून जाणाऱ्या एकाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गिरीधरला पाहिले आणि त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गिरीधर आणि आरोपी साक्षी एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते. साक्षीने वर्गमित्राबरोबर प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर गिरीधर आणि साक्षी यांच्यात जवळीक वाढली. तिच्या पतीला याबाबतची माहिती मिळाल्याने साक्षी आणि पतीचे वाद होत होते. मंगळवारी रात्री साक्षीच्या पतीने दारू प्याली आणि त्याने साक्षीला गिरीधरला बोलावून घे, असे सांगितले. त्यानंतर गिरीधरला हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरच्या मैदानावर बोलावून घेण्यात आले. तेथे साक्षीचा पती आणि गिरीधर यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर शस्त्राने वार करून खून केला, अशी माहिती पोलिसांना आतापर्यंत तपासात मिळाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply