Thakurdev Yatra : आदिवासींच्या संघर्षासाठी ठाकूरदेव यात्रा; छत्तीसगडमधून भाविक दाखल

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात गेली काही वर्षे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड टेकड्या लोहखनिज उत्खनन व खाणीसाठी चर्चेत आहे. लोह खनिज उत्खननासाठी डोंगर सपाट केले जात असून यामुळे जंगल, आदिवासी त्यांच्या परंपरा व दैवत नष्ट होत असल्याची ओरड केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुरजागड येथे वार्षिक ठाकूरदेव यात्रा संपन्न होत आहे. यात्रेत आदिवासी समाज या विषयावर मंथन करणार आहे.

गडचिरोलीसह महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील आदिवासी समाजासाठी एटापल्ली तालुक्यातील सुरजागड टेकड्यांवर असलेल्या ठाकूरदेवाच्या यात्रेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही यात्रा भरते. सुरजागड टेकड्यांवर गेली काही वर्षे लोहखनिज उत्खनन होत आहे. लॉयड मेटल्स कंपनीद्वारे होणारे हे उत्खनन म्हणजे डोंगर सपाट करून जंगल नष्ट करत आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा, दैवते नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे.

७० गावातील नागरिक करतात संयोजन

एकीकडे आदिवासींना विकासाच्या नावावर विस्थापित करायचे आणि दुसरीकडे भांडवलदारांना मोकळीक द्यायची; असा हा डाव असल्याची ओरड सातत्याने होत आहे. या संघर्षातला संवेदनशील मुद्दा म्हणजे सुरजागड परिसरातील ठाकूरदेव यात्रा. हजारो आदिवासी या यात्रेसाठी एकत्र जमतात. कार्यकर्ते विस्थापनाविरोधात भूमिका घेत आहेत. ही आदिवासी समाजाच्या पिढीसाठीची शेवटची हाक असल्याचेही बोलले जात आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत ठाकूरदेवाला नवसाचे बळी दिले जातात. ७० गावांच्या आदिवासी इलाख्यातील नागरिक यात्रेचे संयोजन करतात.

त्या कंपनीकडूनच यात्रेसाठी सोयीसुविधा

नक्षली संवेदनशील भाग असल्याने पोलिस बंदोबस्त तगडा असतो. या यात्रेत विस्थापन व दैवते नष्ट करण्याच्या मुद्द्यावर मंथन- मार्गदर्शन होणार आहे. हे थांबले पाहिजे अशीच आदिवासी कार्यकर्त्यांची भावना आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या लॉयड मेटल या लोहखनिज उत्खनन कंपनीवर आदिवासी समाजाचा रोष आहे. त्याच कंपनीने या परिसरात यात्रेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात्रेतील सुसूत्रता कंपनी व्यवस्थापनामुळे असल्याचे स्पष्टपणे दिसते. आता ज्या कंपनीच्या विरोधात आदिवासी एकवटले आहेत, तीच या भागात सोयीसुविधा पुरवत असल्याचे आढळून आल्यानंतर नक्की संघर्ष कोण आणि कुणासाठी करतोय याबाबत गोंधळाची स्थिती आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply