Sugarcane Rate Chakka Jam Andolan : अखेर ऊसदराची कोंडी फुटली, राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन मागे; 'इतक्या' रुपयांवर निघाला तोडगा

Sugarcane Rate Chakka Jam Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली येथील पुलावर काल (गुरुवार) तब्बल आठ तास केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर  ऊसदराची कोंडी फुटली. त्यामुळे आता शेतांतून कोयता चालणार आहे.

गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये प्रतिटन ३००० रुपये पेक्षा जास्त दर दिलेल्या साखर कारखान्यांकडून प्रतिटन ५० रुपये, तर त्यापेक्षा कमी दर देणाऱ्यांकडून १०० रुपये दुसरा हप्ता दोन महिन्यांनंतर दिला जाणार आहे. तसेच, यावर्षीच्या गळीत हंगामात प्रतिटन ३१०० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगून चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची घोषणा माजी खासदार  राजू शेट्टी यांनी केली.

Weather Update : पुणे, मध्य महाराष्ट्रासह 'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

दरम्यान, गेल्यावर्षीच्या उसासाठी प्रतिटन शंभर व पन्नास रुपये देण्यासाठी सर्व कारखान्यांकडून सहमती पत्र घेतले जाणार आहे. जोपर्यंत हे सहमतीचे पत्र देत नाहीत, तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आंदोलनस्थळी येऊन ऊसदराची कोंडी फुटल्याचे श्री. शेट्टी यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुलालाची आणि फुलांची उधळण करून, तसेच फटाके फोडून जल्लोष केला.

गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन उसाचा ४०० रुपयांचा दुसरा हप्ता, तसेच यावर्षीच्या प्रतिटन उसाला ३५०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले होते. जिल्हामार्ग रोखल्यानंतरही तोडगा न निघाल्याने आज महामार्गावर चक्काजामचे हत्यार उपसले होते. सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी शिरोली येथील पुलावर वाहतूक रोखण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत ही वाहतूक ठप्पच होती. सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.

या बैठकीतील निर्णय श्री. शेट्टी यांनी आंदोलनस्थळी जाहीर सायंकाळी सात वाजता चक्काजाम आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सर्व वाहूतक सुरळीत होण्यासाठी सुमारे एक तासाहून अधिक वेळ लागला. तत्पूर्वी, श्री शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी जो तोडगा काढला आहे. त्याला सहमती असल्याचे पत्र जिल्हाअधिकाऱ्यांना दिले पाहिजे. जोपर्यंत कारखान्यांकडून पत्र दिले जात नाही. तोपर्यंत कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत.

दरम्यान, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या अंगात दहा हत्तीचे बळ आले असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. यावेळी, संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, जिल्हाअध्यक्ष वैभव कांबळे, सावकार मादनाईक आदी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply