एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस धावली! अजित पवारांच्या हस्ते 'शिवाई'ला हिरवा कंदील

पुणे: महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या ताफ्यात आजपासून इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी 'लालपरी' अर्थात एसटी १ जून २०२२ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधत उप मुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते पुण्यात शिवाई या इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन करण्यात आलं.

यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आज एसटी महामंडळाच्या ७४ वर्षांच्या कारकिर्दीतला फार महत्वाचा क्षण आहे. ज्यावेळेस १९४८ साली पहिली बस सोडली होती. ती पुणे ते नगर येथे सोडली होती. तशाच पद्धतीने, मी अनिल परब, नीलमताई आम्ही सगळ्यांनी मिळून वातानुकूलीत बस जी इलेक्ट्रिकवर आहे. ज्यात प्रवास करताना प्रवाशांना आराम मिळणार आहे. सुखद अशा प्रकारच्या प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. यात पर्यावरणाचा पुर्णपणे विचार केला गेलेला आहे. प्रदूषण अजिबात होणार नाही. याची खऱ्या अर्थाने गरज होती. जगात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या बसेस सुरु झालेल्या आहेत. महाराष्ट्रातही इतक्या चांगल्या प्रतीच्या बसेस आमच्या महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत असं अजित पवार म्हणाले.

ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली. १ जून १९४८ ला पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी १ जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो.

आज (बुधवारी) पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'शिवाई'चा लोकार्पण सोहळा पार पडला. अहमदनगर येथूनही शिवाई बस सुटणार आहे. ही बस पुण्यापर्यंत धावेल. १ जून १९४८ रोजी अहमदनगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला गेला.

प्रदूषण विरहीत बस सेवा

दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर,वाहनांमुळे वाढणारे प्रदुषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला, असेही परब यांनी सांगितले. लोकार्पण केल्यानंतर 'शिवाई'च्या पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर दिवसाला ६ फेऱ्या होणार आहेत. यानंतर टप्प्याटप्याने इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असे सांगतानाच आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर व आरामदायी प्रवासामुळे ही बस प्रवाशांच्या नक्कीच पसंतीस उतरेल,असा विश्वासही परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.

'शिवाई'ची ठळक वैशिष्ट्ये…

- बसची लांबी १२ मीटर

- टू बाय टू आसन व्यवस्था

- एकूण ४३ आसने

- ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत गाडी

- गाडी ताशी ८० किमी वेगाने धावणार

- बॅटरी क्षमता ३२२ के.व्ही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply