Solapur : सोलापूरला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा, राज्य सरकार केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव

Solapur : सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असं मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले आहेत. महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, भविष्यात या महाविद्यालयातून पर्यटन क्षेत्रासाठी सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार होतील. त्यातून सोलापूरच्या पर्यटन क्षेत्रवाढीसाठी मदत होईल. त्यामुळेच या महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी गुरूपौर्णिमेचा शुभ दिवस निवडला.

पर्यटन आणि हॉटेलिंग क्षेत्रासाठी उत्तमोत्तम शिक्षण व्यवस्था या महाविद्यालयात केली जाईल. यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. तसेच होम स्टेसाठी येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात अभ्यासक्रमाचा समावेश केला जाईल, असे ते म्हणाले. 

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, या महाविद्यालयात सुरू होणारे पूर्ण वेळ पदवी व पदविका अभ्यासक्रम व लघु अभ्यासक्रम युवक व युवतींना एक पर्वणी ठरेल. विद्यार्थ्यांना पदवी व पदविका याव्यतिरिक्त महिलांना पर्यटन प्रशिक्षण, एमटीडीसी व पर्यटन संचालनालय कर्मचारी प्रशिक्षण, सर्वांसाठी पर्यटन अभ्यासक्रम, मार्गदर्शक प्रशिक्षण, हुनर से रोजगार तक प्रशिक्षण, आदरातिथ्य आधारित अभ्यासक्रम शिकवले जाणार असून, या महाविद्यालयामुळे राज्याच्या पर्यटन व शैक्षणिक क्षेत्रात भर पडली असल्याचे ते म्हणाले.

महाविद्यालयाच्या नामकरणाची घोषणा

लोकप्रतिनिधींच्या आग्रहानुसार या महाविद्यालयाचे नामकरण श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी असे करत असल्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घोषित केले.

उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना गुरूपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयाचे उद्घाटन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनस्थळे अधिक असल्याने जिल्ह्यास तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा, त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, तसेच या महाविद्यालयाचे श्री स्वामी समर्थ महाविद्यालय असे नामकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply