Sinhgad Ghat Road : सिंहगडाच्या घाटरस्त्यावरील उपद्रव शुल्काचे होते काय? त्रस्त पर्यटकांचा भ्रष्टाचाराचा आरोप

सिंहगड - सिंहगडाच्या घाटरस्त्यावरील गोळेवाडी व कोंढणपूर फाटा येथील तपासणी नाक्यांवर दरमहा लाखो रुपये उपद्रव शुल्क जमा होत असताना येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. तसेच सुरक्षिततेबाबत वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याची स्थिती आहे.

त्यामुळे उपद्रव शुल्क म्हणून जमा होणाऱ्या लाखो रुपयांचे नेमके होते काय? असा सवाल पर्यटक व शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. हे पैसे कामगारांच्या पगारासाठी व आवश्यक उपाययोजनांसाठी वापरण्यात येत असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सिंहगडावर वाहन घेऊन जायचे असल्यास दुचाकीसाठी पन्नास रुपये व चारचाकीसाठी शंभर रुपये उपद्रव शुल्क भरावे लागते. त्यासाठी वन विभागाने डोणजे बाजूकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी गोळेवाडी येथे व कोंढणपूर बाजूकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी घाटरस्त्यावरील कोंढणपूर फाटा येथे तपासणी नाका उभारलेला आहे.

येणाऱ्या वाहनचालकांकडून उपद्रव शुल्क घेऊन कर्मचारी त्यांना पावती देतात. दररोज हजारो पर्यटक सिंहगडावर येत असल्याने महिन्याला सरासरी दहा ते पंधरा लाख रुपये इतके उपद्रव शुल्क जमा होते. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने महिन्याला सरासरी वीस ते पंचवीस लाख रुपये उपद्रव शुल्क जमा होते.

Pune Fire News : पुण्यात येवलेवाडी येथे गोडाऊनला भीषण आग! अग्निशामक दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

वन समितीच्या नावे खानापूर येथील महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेत हे पैसे जमा केले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात उपद्रव शुल्क जमा होत असताना सिंहगडावर लघुशंकेसाठीही पैसे घेतले जातात, गडावरील ऐतिहासिक टाक्यांची दुरवस्था झाली आहे.

धोकादायक ठिकाणी रेलिंग नाही, मोफत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, आपत्कालीन मदतीसाठी व्यवस्था नाही, प्रथमोपचाराचीही सोय नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वगळता इतर पैशांचा वापर गडावरील सुधारणांसाठी का होत नाही असा नागरिकांचा प्रश्‍न आहे.

आत्तापर्यंत कोट्यवधी रुपये उपद्रव शुल्क जमा झाले व खर्चही झाले; परंतु आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. सिंहगडावर ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था झालेली असून, अस्वच्छता दिसत आहे. जे पैसे जमा होतात, त्याचा वापर गडाच्या संवर्धन व विकासासाठीच व्हायला हवा. उपद्रव शुल्क म्हणून जमा झालेले पैसे नेमके कोठे खर्च होतात, ते सर्वांना कळायला हवे.

- मंगेश नवघणे, शिवप्रेमी

जमा होणारे पैसे कर्मचाऱ्यांचा पगार आणि गडावरील इतर काही कामांसाठी खर्च केले जातात. त्याचा पूर्ण हिशेब ठेवण्यात येत असून, दरवर्षी ऑडिट केले जाते. शिल्लक रक्कम वन समितीच्या खात्यावर असून, दोन मुदतठेवी आहेत. उपद्रव शुल्क जमा केल्यानंतर प्रत्येकाला पावती दिली जाते, त्या सर्व मशिनचा दररोज घोषवारा लिखित स्वरूपात ठेवला जातो.

- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी

अशी आहे सद्यःस्थिती...

  • १५ ते २० लाख : दरमहा जमा होणारे शुल्क

  • ३३ : एकूण कर्मचारी

  • ४ लाख १० हजार : दरमहा वेतन खर्च

  • ३० लाख ५३ हजार ५७६ रुपये : खात्यावर शिल्लक रक्कम

  • १ कोटी ५ लाख रुपये : मुदत ठेव



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply