Shraddha Murder Case : पोलिसांनी ‘तो’ प्रश्न विचारताच आफताब रडू लागला; ५४ हजार रुपयांमुळे झाला प्रकरणाचा उलगडा

आपली लिव्ह-इन-पार्टनर असलेल्या श्रद्धा वालकर हिचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धाच्या मृतदेहाचा ३५ तुकडे करुन ते जंगलामध्ये फेकून दिल्याची घटना सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. दिल्लीमधील या हत्याकाडांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा चौकशीदरम्यान कसा झाला याबद्दलची माहिती दिली आहे. श्रद्धा जिवंत असून ती इन्स्टाग्रामवर सक्रीय आणि बँकेसंदर्भातील बिलंही भरत आहे असं दाखवण्यासाठी आफताबने तिचा फोन वापरला. कोणीही आपल्याला पकडू नये आणि श्रद्धा बेपत्ता असल्याचं समजून नये या हेतूने केलेली याच कृतीमुळे आफताब पोलिसांच्या जाळ्यात आडकला.

श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी पोलीस स्थानकामध्ये त्कार दाखल केल्यानंतर आफताबला २६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात आला. यावेळी त्याने ‘‘ती भांडण करून घरातून निघून गेली, पण कुठे गेली ते मला माहीत नाही’’, असे उत्तर पोलिसांना दिले. दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाड्याच्या घरात रहात होते. श्रद्धा २२ मे रोजी घर सोडून गेल्याचं आफताबने पोलिसांनी सांगितलं. मात्र आफताबने त्यापूर्वीच म्हणजेच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती हे नंतर स्पष्ट झालं. दिल्लीमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांमध्ये आफताबने तिचा खून केला.

आफताबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा केवळ तिचा मोबाईल सोबत घेऊन गेली होती. श्रद्धाने तिचे कपडे आणि इतर सामना सोबत नेलं नाही असा दावाही आफताबने पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान केला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाअंतर्गत मोबाईलचं नेमकं लोकेशन शोधण्यास आणि कॉल डिटेल्सची माहितीचा शोध घेतला. पोलिसांच्या या तपासामध्ये २२ मे ते २६ मे दरम्यान श्रद्धाच्या खात्यावरुन ५४ हजार रुपये आफताबच्या खात्यावर वळवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. एका बँकेच्या अ‍ॅपवरुन हे पैसे आफताबच्या खात्यावर वळवण्यात आले होते. हा व्यवहार झाला तेव्हा फोन मेहरोलीमधील छत्तरपूर परिसरात असल्याचंही तपासामध्ये दिसून आलं. या माहितीमुळे पोलिसांना आफताबवरील संक्षय अधिक वाढला. मात्र पुन्हा केलेल्या चौकशीमध्ये आफताबने, “ती २२ मे रोजी घर सोडून गेल्यापासून माझ्या संपर्कात नाही,” असं पोलिसांना सांगितलं.

दरम्यानच्या काळात पोलिसांचा तपास सुरु होता. या महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी आफताबला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. यावेळी आफताबने पोलिसांना माझ्याकडे श्रद्धाचा फोन आणि बँकिंग अॅपचा पासवर्ड असल्याने मी पैसे माझ्या खात्यावर वळवल्याची माहिती दिली. आफताब या पैशांनी श्रद्धाच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डचं बील भरत होता. बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्रद्धाच्या मुंबईतील घरी जाऊन या बिलांसंदर्भातील विचारपूस करु नये म्हणून आफताब हे पैसे श्रद्धाच्या खात्यावरुन स्वत:च्या खात्यांवर वळवत बिलं भरत होता.

आफताब श्रद्धाचं इन्स्ताग्राम अकाऊंट वापरत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तो या खात्यावरुन श्रद्धाच्या मैत्रिणींशी चॅट करायचा. ३१ मे रोजीच्या एका चॅट दरम्यान श्रद्धाच्या मालकीच्या या फोनचं लोकेशन मेहरोली होतं असं तपासात समोर आलं. यानंतर वसईमधील मणिकपूर पोलिसांनी दिल्लीतील पोलिसांना फोन करुन सविस्तर माहिती दिली. या माहितीच्या आधारे शनिवारी आफताबला ताब्यात घेण्यात आलं. यावेळी पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवत जर श्रद्धा २२ मे रोजी घर सोडून गेली तर तिच्या मोबाईलचं लोकेशन मेहरोली कसं दाखवतं होतं? हा प्रश्न पोलिसांनी विचारताच आफताबच्या भावनांचा बांध फुटल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आणि मोबाईल लोकेशनसंदर्भातील प्रश्न विचारताच रडतच आफताबने, ‘Yes, I Have Killed Her’ म्हणत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply