Shiv sena Crisis : सर्वात मोठी बातमी! शिवसेनेच्या विधिमंडळातील कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा

Shinde Group at Shiv Sena Vidhan Sabha Office : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट अधिकच आक्रमक झाला आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळात दाखल होत शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदार विधिमंडळातील कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत. 

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, शिवसेनेचा ताबा शिंदेंकडे गेल्यानंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखा तसेच कार्यालये ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदारांनी विधिमंडळात प्रवेश केला. आणि त्याठिकाणी असलेले शिवसेनेचं कार्यालय आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेनेचं विधानभवनातील कार्यालय सुद्धा गेलं आहे. दरम्यान, विधीमंडळ कार्यालयापाठोपाठ मंत्रालयासमोरील शिवालय कार्यालय सुद्धा शिंदे गट आपल्या ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.  

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर येणार?

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर आणण्यासाठी एक मोठा प्लॅन आखला आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर तातडीने स्टे-ऑर्डर आणण्यासाठी ठाकरे गट आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील याबाबत सावध भूमिका घेतली असून ठाकरे गटाने याचिका दाखल करण्यापूर्वीच त्यांनी कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहेत.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमचीही बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती शिंदे गटाच्या वतीने या ‘कॅव्हेट’द्वारे करण्यात केली आहे. ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे.

यामुळेच शिंदे गटातर्फे शनिवारी रात्रीच ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आला आहे. आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाने दाखल केली, तर त्यावर आमची बाजू ऐकून न घेता सुनावणी घेऊन कोणताही आदेश जारी करू नये, असे यात म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply