Shiv Jayanti 2023 : शिवनेरी गड झाला अवघा भगवामय

जुन्नर : शिवजन्मस्थळी पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात बाल शिवाजी ठेऊन पाळणा म्हटला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळण्याची दोरी ओढली आणि सुंठवड्याचे वाटप करत किल्ले शिवनेरीवर पारंपारिक पध्दतीने शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहाचे वातावरण संपन्न झाला.

राष्ट्रगीत तसेच'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्य गीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली.त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.जुन्नर येथील छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाड्याच्या पथकाने मर्दानी खेळांचे चित्तथरारक सादरीकरण केले.शिवकुंज येथील बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे याचे उपस्थितीत झाली यावेळी प्रांताधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रवींद्र सबनीस ,शिवाई देवी ट्रस्टचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.

शिवनेरीवर दिवसभर भगवे फेटे, शर्ट घालून, हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या शिवप्रेमीमुळे शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गड आज अवघा भगवामय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज,बाल शिवाजी व जिजाऊंच्या वेषातील शिवभक्तांचे शिवप्रेमींना दर्शन होत होते.यावेळी शिवप्रेमींच्या 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या जयघोषाने किल्ले शिवनेरीचा परिसर आज दुमदुमून गेला होता.

हातात भगवा झेंडा घेऊन 'जय जिजाऊ जय शिवराय','जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत शिवभक्त दिवसभर गडावर येत होते. शिवनेरीहून राज्याच्या विविध भागात शेकडो शिवज्योती मार्गस्थ झाल्या.

किल्ल्यावरील विविध वास्तुंना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरच्या पंचलिंग चौकातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्या जवळचा परिसर भगवे झेंडे व ढोल ताशांचे गजराने शिवमय झाला होता.

शिवनेरीवर पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली होती.चिंचोळ्या मार्गावर होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यात आले होते.शिवनेरीकडे येणाऱ्या मार्गावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमा,भगवे झेंडे,माळा, खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.शिवभक्तांसाठी विविध संस्था व संघटनानी चहा,पाणी व नाश्ता,जेवण याची व्यवस्था केली होती.

शिवजयंतीसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांसाठी चार वाहनतळ करण्यात आले होते.ते सर्व सकाळीच वाहनांच्या गर्दीने भरले होते.पोलीस प्रशासनाने गर्दीचे नियोजन चांगल्या प्रकारे केले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply