Shirdi News : शिर्डीतील अत्याधुनिक दर्शन कॉम्प्लेक्स तीन महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Shirdi News : साईभक्तांचे दर्शन अधिक सुकर व्हावे यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेले अत्याधुनिक दर्शन रांग काॅप्लेक्स उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तीन महिन्यांपूर्वी या दर्शन काॅम्लेक्सचे काम पूर्ण झाले मात्र उद्घाटनासाठी केवळ प्रधानमंत्र्याची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन लालफितीत अडकल्याची चर्चा आहे. त्यातच तापमानाचा पारा चढलेला असल्याने साईभक्तांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.

कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो तर दररोज सरासरी ५० हजार भाविक शिर्डीत येत असतात. या भाविकांची तासंतास दर्शनरांगेत उभं राहण्यापासून सुटका व्हावी यासाठी १०० कोटींहून अधिक रूपये खर्च करून अत्याधुनिक वातानुकूलीन दर्शन काॅम्लेक्स उभारण्यात आले आहे.

मात्र तीन महिन्यापुर्वी दर्शन काॅम्लेक्सचे काम पुर्ण होऊनही हे कॉम्प्लेक्स उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. दुसरीकडे उन्हाळा सुरू झाला असून तापमानाचा पारा वाढत असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.

चप्पल- बूट आणि मोबाईल ठेवण्यासाठी रांग, वाढत्या तापमानात तासंतास दर्शन रांगेत उभे राहणे तसेच मंदिर परिसरात अनवाणी पायाने उन्हात करावी लागणारी भटकंती यामुळे साईभक्त त्रस्त होताहेत. त्यामुळे साईभक्तांचे हाल थांबवा आणि नवीन दर्शन कॉम्प्लेक्स खुले करा (sai devotees demands to inaugurate shirdi darshan complex) अशी मागणी साई भक्तांनी केली आहे.

शिर्डीचे आमदार तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिसेंबर महिन्यात पत्रकार परिषद घेत मार्च २०२३ मध्ये या दर्शनरांगेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते.

साईबाबा संस्थानवर सध्या तदर्थ समिती कामकाज बघत आहे असे असताना हि समीती कुणाच्या तालावर नाचतेय? असा सवाल साईसंस्थाचे माजी विश्वस्त तथा शिर्डीग्रामस्थ डाॅ. एकनाथ गोंदकर यांनी उपस्थित केला आहे. जर पंधरा दिवसांत हि दर्शन व्यवस्था सुरू केली नाही तर आंदोलनाचा इशारा देखील गोंदकर यांनी दिला आहे.

उन्हाळ्यामुळे सुर्य आग ओकत असताना साईभक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय. त्यामुळे लवकर ही वातानुकूलित दर्शन व्यवस्था सुरू करावी अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply