Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवारांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पुण्यातून अटक केली. सागर बर्वे (34 वर्षे) असं या आरोपीचे नाव आहे. सागरने एका ट्विटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांना धमकी दिली होती. या धमकी प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांना धमकी देणारा आरोपी सागर बर्वेला रविवारी पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे. मुंबई पोलिसांच्या गुनेहा शाखेने ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी सागर बर्वेने फेसबुकवर 'नर्मदाबाई पटवर्धन' नावाने पेज तयार केले होते. त्याने या फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना उद्देशून ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार...’, अशी धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यासोबतच सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुनही आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता.

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन आरोपीविरोधात कडक कारवाई करत अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. तर, केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.

त्यानंतर आरोपीविरोधात मुंबईच्या एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. गुन्हे शाखेने तपासादरम्यान इलेक्ट्रॉनिक टेहळणीच्या आधारे आरोपी सागर बर्वेला पुण्यातून अटक केली. सागरने असे कृत्य का केले, या मागे त्याचा नेमका काय उद्देश होता या सर्व बाजूने पोलिसांचा तपास सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply