Sharad Pawar: लोकसभेला आपल्याला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, पण मविआच्या एकीसाठी दोन पावलं मागे आलो

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. पण त्यावेळी महाविकास आघाडीचे ऐक्य टिकून राहावे, यासाठी मी दोन पावलं मागे आलो, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या  उपस्थितीत पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, यांच्यासह पक्षाचे आठ खासदार बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी शरद पवार यांनी हे वक्तव्य करुन एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांचे हे वक्तव्य पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत मविआच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेईल, असे संकेत मिळत आहेत. 

शरद पवार यांनी आजच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त जागा मिळायला हव्या होत्या. परंतु, महाविकास आघाडीची एकी कायम राहावी, यासाठी मी दोन पावलं मागे आलो. आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. उद्यापासून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे, याची तयारी ठेवा. त्यासाठी लोकांची जास्तीत जास्तं काम करा. राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध येत नाही. राज्यात जास्त प्रश्न असतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेश शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Devendra Fadnavis : पाऊस असेल त्या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया रद्द; गृहमंत्री फडणवीसांची घोषणा

शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागावाटपावेळी काय घडणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने अवघ्या 10 जागा लढवल्या होत्या. तर ठाकरे गटाने 21 आणि काँग्रेस पक्षाने 17 जागा लढवल्या होत्या. मात्र, लोकसभेचा निकाल लागला तेव्हा शरद पवार गटाने 10 पैकी 8, काँग्रेसने 17 पैकी 13 आणि ठाकरे गटाने 21 पैकी अवघ्या 9 जागांवर विजय मिळवला होता. शरद पवार गटाचा लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट 80 टक्के इतका होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट जास्त जागांची मागणी करणार, याचा अंदाज वर्तविला जात होता. शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्याने या अंदाजाला आणखीनच बळकटी मिळाली आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश

इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत कुठलीही गडबड होऊ नये यासाठी शरद पवारांनी लोकसभेला कमी जागांवर समाधान मानले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी 23 पेक्षा अधिक जागा लढवल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोठी ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण झाला आहे, असे शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी सांगितले. 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply