Sant Dnyaneshwar Maharaj : हरिनामाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली

आळंदी - आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (ता. ११) सायंकाळी चार ते सहा दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून छोट्या-मोठ्या दिंड्या दाखल होत आहेत. हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन आणि हरिपाठाच्या निनादाने अवघी अलंकापुरी भक्तिरसात चिंब झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून आळंदीत वारकऱ्यांची लगबग दिसू लागली आहे. खास करून इंद्रायणी काठी, सिद्धबेट, गोपाळपुरा या भागात वारकऱ्यांची विशेष गर्दी आहे. काही छोट्या- मोठ्या दिंड्या पायी आळंदीत पोहोचू लागल्या आहेत. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश, नाशिक आदी भागातील वारकरी सध्या मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या टाळांचा निनाद कानी येत आहे.

शहरातील धर्मशाळांमध्ये वारकरी मुक्कामी आहेत. अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत बांधकामे झाल्याने राहुट्यांची संख्या मोजकीच आहे. दुसऱ्या दिवशी पालखी पुण्याकडे जाणार असल्याने काही दिंड्या तसेच वारकरी पुण्याच्या बाजूने काळेवाडी देहूफाटा, चऱ्होली, वडमुखवाडी भागात निवास करू लागले आहेत. देऊळवाड्यात पहाटेपासूनच माउलींच्या समाधी दर्शनासाठी गर्दी झाली. इंद्रायणीकाठी वासुदेवांची गर्दी आहे.

दुकाने सजली...

वारकऱ्यांचे आगमन झाल्याने शहरातील भराव रस्ता, गोपाळपुरा, वडगाव रस्ता, पद्मावती रस्ता, महाद्वारातील दुकाने टाळ, मृदंग, प्रसाद, देवदेवतांच्या छायाचित्रांनी सजलेली दिसून येत आहेत.

सव्वाशे आळंदीकरांना खांदेकऱ्यांचा मान

पालखी प्रस्थान दिवशी रविवारी (ता. ११) पालखीला खांदा देणाऱ्या सव्वाशे आळंदीकर खांदेकऱ्यांनाच मंदिरात फोटोपास आणि आधारकार्ड पाहून प्रवेश दिला जाईल. खांदेकऱ्यांची नावे उद्या (ता. १०) सकाळी दहा वाजेपर्यंत देवस्थानकडे नोंदवली तरच फोटोपास देण्यात येणार असल्याचे पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी सांगितले. याबाबत आळंदीकर आणि अॅड. ढगे यांची बैठक आज झाली.

यापूर्वीच्या संस्थानचे विश्वस्त, पोलिस प्रशासन आणि आळंदीकरांच्या बैठकीत पन्नास जणांना प्रवेश देण्यावर एकमत झाले होते. मात्र, आळंदीकरांची अन्य गटाने संख्या वाढवून मागितली. यावेळी देवस्थानकडून सव्वाशे जणांना प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले. पालखीला प्रस्थान काळात खांदा देण्याचा मान आळंदीकरांचा आहे. गर्दीचे नियोजन म्हणून वारकरी, खांदेकरी, पत्रकार प्रशासनातील गर्दी यंदा मर्यादित राहणार आहे.

प्रशासन सज्ज...

पालिकेच्यावतीने वारकऱ्यांच्या सोयीसाठी टॅंकरही उपलब्ध ठेवले आहेत. शौचालये विविध ठिकाणी उभारली आहेत. जीवरक्षक रबर बोट इंद्रायणीत तैनात केली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना पालिका कार्यालयात आहे. इंद्रायणी नदीपात्रातील स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमले आहेत. ग्रामिण रुग्णालयाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका, कर्मचारी औषधसाठ्यासह नेमले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply