Sanjay Raut : बंडखोरी करणाऱ्यांची पक्षाने हकालपट्टी करावी, संजय राऊतांची विशाल पाटील यांच्यावर टीका

Sanjay Raut : राज्यातला सांगली लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचसोबत त्यांनी काँग्रेस पक्षाकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 'बंडखोरी करणाऱ्यांची पक्षाने हकालपट्टी करावी.', अशी टीका संजय राऊत यांनी विशाल पाटील यांचे नाव न घेता केली आहे.

नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, 'काँग्रेस अपक्ष आहे का हे माहीत नाही. जर कुणी बंडखोरी करून निवडणूक लढवत असेल तर कारवाई केली पाहिजे. जर एखाद्या पक्षाचा नेता शिस्तभंग करत असेल तर पक्षाने त्याची हकालपट्टी करावी.' तसंच, 'कुणाची ताकत किती आहे हे लोक ठरवतील.' असे म्हणत संजय राऊत यांनी सांगलीत आमचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Ajit Pawar : 'तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ, त्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा', अजित पवारांचे इंदापूरमध्ये विधान

संजय राऊत यांनी यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35+ जागांवर विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, 'निवडणूकीला हळूहळू रंग चढत जाईल. जे सर्व्ह येत आहेत त्याबाबद्दल आम्ही सहमत नाही. आम्हाला महाराष्ट्रात 100 टक्के यश मिळेल. देवेंद्र फडणवीस जे सांगत आहेत 45+ त्याचे आकडे काहीही असू द्या त्यांना आकडे लावण्याची सवय आहे. निवडणूकीच्या नंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल.' असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तसंच, 'महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल. महाराष्ट्रात 35 + जागा आणि देशात 305 जागा आम्हाला मिळतील.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांना त्यांचा उमेदवार बदलावा लागला. विद्यमान खासदारांला तिकीट देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना रोड शो घेऊ द्या पण काहीही हातात पडणार नाही. मुख्यमंत्री यांचे रामप्रेम खोटं आहे. कोणत्याही लढ्यात आणि संघर्षात ते नव्हते. राम पळकुट्यांच्या मागे राहत नाही. आत्मविश्वासाने लढतात त्यांच्यासोबत राम असतो.', अशी टीका त्यांनी केली आहे.

अजित पवारांच्या निधीबाबतच्या वक्तव्यावर मत व्यक्त करताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत. त्यामुळे ते सौदा करतील. देश देखील व्यापारी चालवत आहे. त्याचे एजंट अजित पवार आहेत.' असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply