Rapido Bike Taxi : ‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश

Mumbai Highcourt On Rapido Bike Taxi : रॅपिडो या मोबाईल आधारित टॅक्सी- बाईक सेवा देणाऱ्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आज दुपारपासून राज्यातील रॅपिडोची सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी रॅपिडोकडे आवश्यक परवाना नसल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने हे निर्देश दिले. दरम्यान, याप्रकरणी २० जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून रॅपिडो बंद करा, अशी मागणी पुण्यातील रिक्षाचालकांकडून करण्यात येत होती. यासाठी अनेकदा रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही रॅपिडो सुरु असल्याचं निदर्शनास आल्यानंतर रिक्षाचालक पुन्हा आक्रमक झाल्याचे बघायला मिळालं होतं.

दरम्यान, हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी रॅपिडोकडे आवश्यक परवाना नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने आज दुपारी १ वाजेपासून राज्यातील रॅपिडोची सेवा २० जानेवारीपर्यंत बंद करावी, असे निर्देश दिले. न्यायालयाच्या या निर्देशानंतर रिक्षाचालाकांच्या मागणीला यश आल्याची चर्चा आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply