Rajasthan Hisar Accident : गावी परतणाऱ्या कुटुंबांवर काळाचा घाला; पिकअप-ट्रकच्या धडकेत पाच जण जागीच ठार, 12 प्रवासी जखमी

Rajasthan Hisar Accident : शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हिसारजवळील राजगड इथं सालासरहून परतणाऱ्या पिकअप वाहनाची ट्रकला जोरदार धडक बसली.

या पिकअपमध्ये दोन कुटुंबातील 17 जण होते. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हिसारजवळील राजगड इथं रात्री उशिरा पिकअपची ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात खूप भीषण होता. ट्रकला धडकल्यामुळं वाहन रस्त्याच्या कडेला उलटलं, त्यामुळं पिकअपमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना हिसार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बिमला (वय 60), तिची मेहुणी कृष्णा (50), अंकित (10) आणि 2 वर्षांची सृष्टी अशी मृतांची नावं आहेत. जखमींमध्ये कविता (41), ओमपती (60), परवीन (27), सुनीता (30), पूजा (13), आंचल (14), प्रीती (15) व अर्णब, मनीषा, मंजू सोनू (आडनाव समजू शकले नाही) आदी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्याहदवा गावातील 17 जण पिकअपमधून सालासरला गेले होते. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या गावी परतत होते. दरम्यान, राजस्थानमधील हरियाणा सीमेजवळील राजगढ बायपासवर एका ट्रकला धडक दिली. नीलगायीला वाचवण्याच्या नादात गाडीवरचा ताबा सुटला आणि कार ट्रकला जावून धडकली, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply