Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”

Raj Thackeray : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. २० नोव्हेंबरला मतदान आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगताना दिसतो आहे. दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेचेही उमेदवार रिंगणात आहेत. माझ्याशिवाय महायुतीचं सरकार बसणार नाही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. तसंच त्यांचाही जोरदार प्रचार सुरु आहे. दिंडोशी येथे झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

निवडणूक सभांचा प्रचार करणं कंटाळवाणं असतं. आता टीव्हीवर लाइव्हही दाखवतात. तेच तेच बोलावं लागतं. किती गोष्टी तुम्ही ऐकल्या मला माहीत नाही. पण तेच तेच विषय बोलावे लागतात असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना या पक्षातल्या फुटीवर त्यांनी भाष्य केलं.

पाच वर्षांतला गोंधळ तुम्ही पाहिला आहे

Pune : खडकवासला मतदारसंघात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, वारजे भागात विनापरवानगी सभेचे आयोजन

राज ठाकरे म्हणाले, “मागच्या पाच वर्षांतला सगळा गोंधळ तुम्ही पाहिला आहे. काय गोष्टी घडल्या? कोण कुणाबरोबर गेलं? तुम्हाला माहीत आहे. कुठपर्यंत गेलं प्रकरण? हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ती आज एकनाथ शिंदेंकडे गेली. निवडणूक चिन्हासकट ती शिवसेना गेली. मला अजूनही आठवतंय मराठवाड्यात एक घोषणा होती. बाण हवा की खान? दुर्दैव असं की उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय. उरलेत फक्त खान. वर्सोव्यात उमेदवार कोण दिलाय? हारुन खान. हा शिवसेनेचा उमेदवार आहे. ज्याच्या नावात हारुन आहे तो विजयी कसा होईल?” असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली.

इथपर्यंत वेळ आली तुमच्यावर?

पुढे राज ठाकरे म्हणाले, “इथपर्यंत तुमची वेळ गेली? कडवट हिंदुत्ववादीपासून मुसलमानांसमोर लाचार होईपर्यंत. उबाठा शिवसेनेचे उमेदवार उर्दूत पत्रक काढत आहेत. कुठपर्यंत मजल गेली आहे बघा. मी मनसेच्या जाहिराती दिल्या मध्यंतरी वर्तमान पत्रांमध्ये. त्या तुम्ही कदाचित पाहिल्या असतील. मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरही मराठी जाहिरात दिली होती. इंग्रजी वर्तमानपत्र आहे म्हणून इंग्रजीत जाहिरात नाही दिली. सगळ्याच गोष्टी सोडून द्यायच्या असतील तर तुमच्याकडे (उद्धव ठाकरे) उरलं काय? आपल्याकडे इथे छान कंदिल आहे. चांगली गोष्ट आहे. आपण शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सव साजरा करतो. तो दीपोत्सव बघायला हजारोंच्या संख्येने लोक येतात. रविवारी अचानक सगळे लाइट बंद करुन टाकले. १४ तारखेला पंतप्रधान येणार आहेत. त्यामुळे दिवाळीचे लाइट्स काढून टाकले. दिवाळीच्या लाइटशी पंतप्रधानांच्या सुरक्षेशी काय संबंध? नको तिथे कशाला सिक्युरीटी?” असा सवाल राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) विचारला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply