Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी नाराज? नाना पटोले म्हणाले, “आम्ही…”

Rahul Gandhi :  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र या फॉर्म्युल्यावर राहुल गांधी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. काँग्रेसची बैठक काही वेळापूर्वी दिल्लीत पार पडली. यानंतर महाराष्ट्र निवडणूक प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आमची दुसरी यादी लवकरच येईल असं सांगितलं. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना राहुल गांधी ( Rahul Gandhi ) जागावाटपाच्या फॉर्म्युलावर नाराज आहेत का? असं विचारलं तेव्हा त्यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

रमेश चेन्निथला काय म्हणाले?

“आज आमच्या काँग्रेसची बैठक पार पडली, आम्ही इतर जागांवर चर्चा केली. जी यादी ठरवली आहे ती यादी लवकरच तुम्हाला मिळेल. काँग्रेसची शनिवारी आणखी एक बैठक होणार आहे ती ऑनलाईन स्वरुपाची असेल. त्यानंतर आम्ही सगळ्या जागा घोषित करु. महाविकास आघाडी एकत्रितपणे समोर जात आहोत. आघाडी म्हटल्यानंतर थोडंफार जागांवरुन काही गोष्टी घडतात. महाराष्ट्रातील जनतेची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला हा विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल. या भ्रष्ट सरकारला हटवण्यासाठी लोक आतूर आहेत. लोकसभेला जसे निकाल लागले तसेच निकाल येत्या विधानसभेलाही लागलेले दिसतील.” असं चेन्निथला म्हणाले आहेत.आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला हा शेवटच्या टप्प्यात आला आहे. सगळं माध्यमांना समजणार आहेच. आम्ही आज आमच्या जागांवर चर्चा केली आहे. असंही चेन्निथला यांनी सांगितलं.

Dharashiva : परंड्यात आघाडीत बिघाडी? ठाकरेंची सेना-मोठ्या पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने

नाना पटोले यांनी काय म्हटलं आहे?

आज आम्ही दिल्लीत दुसऱ्या यादीबाबत चर्चा केली. आमची दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. महाराष्ट्रात आमची कामगिरी चांगली झालेली दिसेल. महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण बहुमतात आलेलं तुम्हाला दिसेल. लोकसभेला जशी कामगिरी झाली त्याहून चांगली कामगिरी आम्ही महाराष्ट्र विधानसभेला करु. या भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारला आम्ही घालवणार आहोत. या सरकारला मुळासकट उखडून टाकण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला आहे. भाजपाकडून फेक नरेटिव्ह पसरवलं जातं आहे. आमच्या विरोधात खोट्या बातम्या चालवून ते लोकांची दिशाभूल करत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह जेवढ्या सभा करतील तेवढा जास्त फायदा महाविकास आघाडीला होईल असं नाना पटोले म्हणाले.

राहुल गांधी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर नाराज?

राहुल गांधी ( Rahul Gandhi ) महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर नाराज झाले आहेत का? हे विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “काँग्रेस पक्षाला कायमच टार्गेट केलं जातं असं दिसतं आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काँग्रेसला मेरिटच्या आधारावर जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. मात्र तीन पक्षांची आघाडी आहे, तसंच मित्र पक्ष आहेत. त्यामुळे समसमान जागा वाटपाचं सोल्युशन काढलं. आम्ही ही बाब राहुल गांधींना समजावून सांगितली आहे. त्यांनी यावर समाधान व्यक्त केलं आहे. सोशल इंजिनिअरिंग हा राहुल गांधींचा ( Rahul Gandhi ) अजेंडा आहे. सत्तेचा वाटा सगळ्यांना मिळाला पाहिजे ही राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भूमिका आहे. जागा वाटप जसं ठरलं त्या त्या जागांमध्ये आम्ही ओबीसी चेहरा ठेवला आहेत. आमचा एकच मुद्दा आहे की शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांना संपवणाऱ्या सरकारला बाहेर काढणं हा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही समझौता करु. मेरिटवर जागा मिळाव्यात असा आमचा प्रयत्न असणार आहे. बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंशी आणि शरद पवारांशी चर्चा करणार आहे. शनिवारी आमची एक बैठक पार पडेल. उरलेल्या जागांचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. ज्या जागा काँग्रेसला मिळाव्यात हे आम्ही सांगितलं होतं त्या जागांबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. मेरिटच्या आधारे निर्णय घेतला जावा ही काँग्रेसची भूमिका आहे.”



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply