Pune Water Supply : पुणे शहराची पाणीकपात रद्द; पालकमंत्री पाटील यांची घोषणा

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पुरेसा पाणीसाठा झाल्याने महापालिकेकडून सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी आढावा बैठकीत केली. त्यामुळे पुणेकरांना आठवड्यातील सातही दिवस पाणी मिळणार आहे.

यंदा पावसाला उशिरा सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन ३१ ऑगस्टपर्यंत करण्याचा आदेश राज्य सरकारने महापालिका प्रशासनास दिला होता.

त्यानुसार, १८ मे पासून दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरण साखळीमधील धरणांतील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली. त्यामुळे पाणीकपात रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.

या पार्श्‍वभूमीवर, पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी दुपारी पाण्याबाबत आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Satara Accident News : २० ते २५ प्रवाशांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल; भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू

शहरासाठी लागणारे पाणी आणि शेतीसाठीच्या पाण्याच्या उपलब्धतेविषयी बैठकीत चर्चा झाली. शेती, तलावांसाठी पुरेसे पाणी देण्याचा आदेश पाटील यांनी दिला. तसेच खबरदारी म्हणून ६० दिवसांनी पुन्हा पावसाचा व उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. पाणी कपात रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या गुरुवारपासून करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

पाऊस चांगला झाल्याने धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच होईल. शेतीसाठीही पुरेसे पाणी सोडले जाईल, दोन महिन्यांचे आवर्तन असेल. त्यानंतर पावसाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ.

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply